(नागपूर)
गडचिरोली आणि वडसा वनविभागात नागरिकांना आणि पाळीव प्राण्यांना आपले लक्ष्य करुन धुमाकूळ माजविणाऱ्या टी-14 वाघीणीला रविवारी वडसा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपूरमधील कक्ष क्र. 866 मध्ये जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे.
11 सप्टेंबर रोजी महानंदा मोहुर्ले (५१, रा. फरी) यांच्यावर कक्ष क्र. 853 मध्ये हल्ला करीत टी-14 या वाघीणीने ठार केले होते. देसाईगंज वनपरीक्षेत्रातील फरी येथे ११ सप्टेंबर रोजी महानंदा मोहूर्ले या गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कक्ष क्र. ८५३ मध्ये टी- १४ या वाघिणीने हल्ला केला. त्यानंतर ५० मीटर अंतरावर जंगलात फरफटत नेऊन ठार केले होते. यानंतर त्याच रात्री या वाघिणीने शेळीचा फडशा पाडला होता. त्यामुळे उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी एक बैल ठार केला होता. टी-14 वाघीणीच्या या परिसरातील वास्तव्यामुळे वाटसरू आणि नागरिकांमध्ये दहशत होती. उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी या मार्गावर येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करीत असल्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या.
वनविभागाकडून सदर वाघीणीचे नियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू होती. रस्त्याने जाणेयेणे करणाऱ्या नागरिकांवर धावून हल्ला करण्याची प्रवृत्ती पाहता या वाघीणीमुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी जेरबंद करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर रविवारी तिला जेरबंद करण्यात आले.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा लावून ट्रॅप कॅमेरेही लावले होते. वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र- शिवराजपुर मधील कक्ष क्र. ८६६ मध्ये चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी रविवारी सकाळच्या सुमारास डार्ट करून (इंजेक्शन देऊन) वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर चमुच्या सहाय्यान पिंजऱ्यात कैद केले. वनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्रीय कर्मचारी अक्षय दांडेकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.