(मंडणगड)
दहशतवादी विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे मोठी कारवाई केली आहे. पुणे-कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवादी जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या करत होते. यामध्ये संबंधित व्यक्तीचा काही सहभाग असल्याच्या संशयावरून एटीएसच्या पथकाने एका संशयिताला मंडणगड परिसरात ताब्यात घेतले आहे.
पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच (२२ जुलै) पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या एका संशयिताला एटीएसच्या टीमने मंडणगडमधून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्याला पुण्याला घेऊन पथक गेले आहे. त्यामुळे या दहशतवाद्याशी काही रत्नागिरी कनेक्शन आहे का? याची चौकशी सुरू आहे.