(मुंबई)
यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व असे महत्व आले आहे. कारण शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन दसरा मेळावे होत आहेत. शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्दी खेचण्याची सर्वोतोपरी तयारी सुरू आहे. तर या दसरा मेळाव्याला होणारी वातावरण निर्मिती कायम ठेवण्यासठी शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यापासून होणार आहे.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त ही सभा ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर या यात्रेची सांगता कोल्हापुरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे लगेचच ही सभा घेणार आहेत.
ठाण्यातील टेंभी नाका येथील जाहीर सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रमूख शहरात जाहीर सभा घेणारअसल्याचे सांगण्यात येत आहे. या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणारआहे.
या महाप्रबोधन यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या महाप्रबोधन यात्रेच्यादरम्यान उद्धव ठाकरे हे राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार आहेत. यात प्रामुख्याने ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये ते भव्य सभा घेऊ शकतात. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत.