(पुणे)
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा पुढील काही तासांतच छडा लागण्याची शक्यता आहे. दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता. काही दिवसांनंतर दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. राहुल हांडोरे फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर मोठं यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार आणि राहुल हांडोरे एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याने राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोघेही पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाली होती. दर्शनाला वन विभागाची सरकारी नोकरी मिळणार होती. दर्शनाला वनअधिकारी पद मिळणार होतं. परंतु दर्शनाच्या घरच्यांनी दुसऱ्याच तरुणासोबत दर्शनाच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यामुळं दर्शनाने राहुलशी ब्रेकअप केले होते. त्यावरून राहुल सतत नैराश्य असायचा. तो सतत दर्शनाला फोन करीत असे व यांच्यात सातत्याने वाद होते. दर्शना लग्नाला नकार देत असल्याच्या कारणावरूनच राहुलने राजगडाच्या पायथ्याशी तिची हत्या केली असावी व त्या रागाने दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी फेकून राहुल फरार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. आता पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.