( रत्नागिरी / प्रतिनिधी )
2022 च्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आणि मुलांच्या सहलीच्या गाड्यांची गर्दी जिल्ह्यात वाढत आहे. परिणामी यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. वाढत्या पर्यटकांमुळे पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पसंती दिसून येत आहे. पर्यटकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे. गेल्या वर्षभरात पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातून दिवसाला पाचहून अधिक सहलींच्या गाड्या दाखल होत आहेत. रत्नागिरी हे पर्यटन स्थळ असल्यामुळे तालुक्यातील गणपतीपुळे, थिबा पॅलेस, लो. टिळक स्मारक, जिजामाता उद्यान, भगवती बंदर अशा अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. गणपतीपुळे, मांडवी समुद्र किनाऱ्यावरही प्रचंड गर्दी होत आहे. आणखी काही दिवसांनी हॉटेल्स, मॉल्स मोठ्या प्रमाणात फुल्ल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.