(मुंबई)
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली तर तिलक वर्मा याने झटपट ४१ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढू दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय ठरला तर दिल्लीचा हा सलग चौथा पराभव झाला. अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेत टीम डेव्हिड आणि ग्रीनने मुंबईला विजय मिळवून दिला आहे.
रोहित शर्मा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने ४५ चंडूत ६५ धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने सुरुवातीला ईशान किशन याच्यासोबत ७१ धावांची भागिदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा याच्यासोबतही अर्धशतकी खेळी केली.
तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. रोहित शर्माला साथ देताना तिलक वर्मा याने चौकार आणि षटकार लगावले. तिलक वर्मा याने २९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. तिलक वर्मा याने रोहित शर्मासोबत महत्वाच्या क्षणी अर्धशतकी भागादारी करत धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. ईशान किशन यानेही दमदार फलंदाजी केली. तो दुर्देवीरित्या धावबाद झाला. ईशान किशन याने रोहित शर्मासोबत ७१ धावांची सलामी दिली. ईशान किशन याने २६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले.
सूर्याचा फ्लॉप शो
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप सूर्यकुमार यादव याची बॅट शांतच आहे. सलग तिस-या सामन्यात सूर्या स्वस्तात बाद झाला. सूर्यकुमार यादव आज गोल्डन डकचा शिकार झाला. त्याला मुकेश कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला.
डेविड-ग्रीन यांचा फिनिशिंग टच
लागोपाठ विकेट पडल्यानंतर टिम डेविड-कॅमरुन ग्रीन यांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी १९ चेंडूत ३० धावांची भागिदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. टिम डेविड याने १३ धावांची खेळी केली तर कॅमरुन ग्रीन याने ८ चेंडूत १७ धावांची खेळी केली.