(रत्नागिरी)
जिल्ह्यातील मत्स्योद्योग विकासासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) कोट्यवधी रुपयांची कर्ज देण्यात आली; परंतु या कर्जाची परतफेड करण्यात टाळाटाळ होऊ लागल्याने थकीत कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच कार्यवाहीत कर्जवसुली पथकाने पावस येथील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या बर्फ फॅक्टरीवर जप्तीची कारवाई केली.
राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून मत्स्योद्योग विकासासाठी कर्ज दिली जातात. मच्छीमार नौका, बर्फ फॅक्टरी, मत्स्य प्रक्रिया उद्योग, मच्छीमार संस्थाचा विकास, मत्स्योद्योग संदर्भातील वाहतुकीची वाहने खरेदी इत्यादींसाठी कर्ज दिले जाते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातही कर्ज वाटप झाले आहे. यातील मुद्दल व व्याजाची ११६ कोटी रूपये थकबाकी आहे.
या वसुलीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या चार अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पावस येथील बर्फ फॅक्टरीवर जप्तीची कारवाई केली. पावस येथील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला २००२ साली बर्फ फॅक्टरीसाठी ५५ लाख रूपयांचे कर्ज देण्यात आले. या कर्जाच्या हप्त्याची फेडच होत नसल्याने हे कर्ज व्याजासह १ कोटी ३२ लाख रूपयांवर पोहोचले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ११६ कोटींची थकबाकी
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून कर्ज प्रकरणे झाली आहेत. त्यातील तब्बल ११६ कोटी रूपयांची मुद्दलसह व्याजाची थकबाकी वसुली करण्याची कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी वसुलीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा कर्ज हप्ते फेडण्यासाठी मुदत मागून घेण्यात आली. परंतु, तरीही अनेक कर्जदारांनी पैसे न भरल्याने आता जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे.