(नवी दिल्ली)
राहुल गांधींनी कुरुक्षेत्र येथे आयोजित जाहीर सभेत कडाक्याच्या थंडीतही स्वेटर परिधान न करता केवळ टी-शर्टवर पदयात्रा करण्यामागचे रहस्य सांगितले आहे. विशेष म्हणजे सध्याच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी फक्त टी-शर्ट घालून फिरत आहेत. दिल्लीच्या शरीर गोठवणाऱ्या थंडीतही राहुल गांधींनी टी-शर्टपरिधान करून पदयात्रा केली होती. यानंतर राहुल गांधींना थंडी वाजत नाही का, हा कुतूहलाचा विषय बनला होता. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा झाली. अखेर हरियाणातील भारत जोडो यात्रेदरम्यान खुद्द राहुल गांधींनीच हे गुपित उघड केले. राहुल कुरुक्षेत्रात म्हणाले की, आज मी तुम्हाला सांगतो की, केवळ टी-शर्ट का घालतो.
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, हा प्रवास केरळमधून सुरू झाला. तेव्हा खूप उष्णता होती. पण मी मध्य प्रदेशात पोहोचलो तेव्हा थंडी पडायला लागली होती. एके दिवशी पहाटे तीन गरीब मुली माझ्याकडे आल्या. त्या तीन मुलींना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. मी त्यांना फोटो काढण्यासाठी पकडले तेव्हा त्या थंडीने थरथरत होत्या. तिघींनीही पातळ टी-शर्ट घातले होते. त्या दिवशी मी ठरवले की, मी जोपर्यंत थंडीने थरथर कापणार नाही, तोपर्यंत केवळ टी-शर्टच घालणार.
#WATCH | When yatra reached MP,it was mildly cold. Three poor children came to me in torn shirts, they were shivering when I held them.That day, I decided until I shiver I will only be wearing t-shirt. When I start shivering & feel cold I would think to wear sweater: Rahul Gandhi pic.twitter.com/aCudG8swTQ
— ANI (@ANI) January 9, 2023
राहुल गांधी म्हणाले, जेव्हा मला थंडी वाजायला लागेल,जेव्हा मला प्रचंड त्रास होऊ लागेल तेव्हा मी स्वेटर घालण्याचा विचार करेन. मला त्या तीन मुलींना एक संदेश द्यायचा आहे की, जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर राहुल गांधींनाही थंडी वाजत आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वेटर घालाल त्याच दिवशी राहुल गांधीही स्वेटर घालतील. अशाप्रकारे त्यांनी कुरुक्षेत्रात केवळ टी-शर्ट परिधान करण्यामागचे कारण विषद केले.