(गणपतीपुळे / वैभव पवार)
तब्बल ४० तास अथक प्रयत्न करून पुन्हा समुद्रात सोडण्यात आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री हा व्हेल मासा पुन्हा एकदा गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आला.
सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास व्हेल मासा किनाऱ्यावर आला असल्याचे दिसून आले होते. जवळपास तीन वेळा या माशाला समुद्रात सोडले गेले, परंतु मंगळवारी सकाळी १४ नोव्हेंबर रोजी हा मासा पुन्हा समुद्रकिनारी दिसला. त्यानंतर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन व्हेल’ सुरू करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाला समुद्रामध्ये सोडण्यात यश आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हा व्हेल मासा समुद्र किनारी मृत अवस्थेत आढळून आल्याने प्रशासन ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांना अखेर अपयश आलं आहे.
बुधवारी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले. २० फुटांहून अधिक लांब आणि ५ ते ६ टन इतके या माशाच्या पिल्लाचे वजन होते. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे.