(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आज सकाळी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. दोनच दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आणि आज शनिवार सकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नाचणे येथील साईदीप गृहसंकुल, शांतीनगर, याठिकाणी अविनाश म्हात्रे हा रिक्षा चालक राहात होता. आज सकाळी इमारतीच्या टेरेसवर या रिक्षा चालकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे.
रिक्षातून जाणाऱ्या युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी अविनाश म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवसांपूर्वीच या रिक्षा चालकाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. संबंधित युवतीने आपल्यासोबत जो प्रकार घडला त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावर रत्नागिरीत संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याच रिक्षाचालकाने बिल्डिंगच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.