( खेड / इक्बाल जमादार )
महामार्गाचे काम गेली १५ वर्ष सुरू असून ते नियमाप्रमाणे होत नाही महामार्गाबाबत लोकप्रतिनिधीने आवाज उठवण्याची अत्यंत गरज आहे. कोकणातील एखादा मोठा नेता अपघातात मरण पावेल, त्याचवेळी महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले.
मुंबई – गोवा हायवेवर अपघाताच्या घटना वारंवार सुरूच आहेत. अशाच पद्धतीचा भीषण अपघात गुरूवारी ( 19 जानेवारी) पहाटे ५ वाजण्याच्या माणगाव लोणेरेमध्ये रेपोली या ठिकाणी घडला. मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक व मुंबईहून गुहागरला जाणारी इको गाडीमध्ये जोरदार टक्कर होऊन अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू होऊन एक चार वर्षाचा मुलगा बचावला होता. मुलगा गंभीर जखमी होता. या मुलाला उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आरोग्य यंत्रणाच खिळखिळी झाल्यामुळे बचावलेल्या चिमुकल्याला तातडीचे उपचार मिळाले नाहीत. त्या मुलाला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. प्रवासादरम्यान या मुलाचा देखील मृत्यू झाला. असे एकूण १० जण दगावले. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याची उत्तम व्यवस्था असती तर या बाळाचा कदाचित जीव वाचला असता.
रायगडमध्ये गुरुवारी (१९ रोजी) झालेल्या अपघातात गुहागरातील कुटुंब उद्धवस्त झाले. त्यानंतर वैभव खेडेकर यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, रायगडमधील रेपोली येथे झालेल्या अपघाताला नक्की कारणीभूत कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा ठेकेदार असेल हे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहेत. गेली १५ वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम पाहिले तर कोणत्याही नियमानुसार ते होत नाही. ना धड सर्व्हिस रोड, ना पर्यायी मार्ग, ना मोठे फलक. त्यामुळे महामार्गावरून वाहन चालविताना चालक संदिग्ध असतो. संभ्रमावस्थेत असतो. रस्त्यावर नेमके वळण कोठे आहे, याचा अंदाज चालकांना येत नाही. त्यामुळे अंधारात अपघात होतात, असे त्यांनी सांगितले.
या महामार्गावरील अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडले. याला ठेकेदार आणि प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. सर्व दोष चालकांवर देऊन चालणार नाही. या अपघातात गुहागरातील संपूर्ण कुटुंब उद्धस्त झाले आहे. आता अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल होईल, कारवाई होईल. परंतु, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर होण्यासाठी व अपघातांची मालिका रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज आहे. कोकणातील एखादा मोठा नेता ज्यावेळी महामार्गावरील अपघातात मरण पावेल, त्याचवेळी या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहनचालकांना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यातूनच जर एखादा अपघात घडला तर अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातच अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो. शेवटी काय तर कोकणवसियांच्या नशिबी मृत्यूचा फासच आवळला गेला आहे. एका दिवसात १४ मृत्यू झाले आहेत आता तरी या सरकारला आणि प्रशासनाला जाग येणार का? असा थेट प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.