नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा खेड तालुक्यातील जिल्हा परिषदचे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नळपाणी योजनांच्या विहिरी, जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांचाही समावेश आहे. एक-दोन ठिकाणी ग्रामपंचायत इमारतीचीही पडझड झाली आहे. तालुक्यातील फुरुस फळसोंडे येथील जिल्हा परिषद शाळेचे तर पुर्ण छप्परच उडून गेले आहे.
रविवारी झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम त्या वेळी जाणवले नव्हते. मात्र ग्रामीण भागातून आता जसजसे पंचनामे येऊ लागले आहेत तसतसे वादळाचे भयानक परिणाम समोर येऊ लागले आहेत. या वादळात काही शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंचवली येथे एका घराचे पुर्ण छप्पर उडून गेल्याने रहायचे कुठे असा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला आहे.
एप्रिल आणि मे हे दोन महिने पाणी टंचाईचे आहेत. या दोन महिन्यांमध्ये अनेक गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. काही गावांमध्ये तर पाण्याची इतकी टंचाई असते की हंडाभर पाणी मिळवण्यासाठी अख्खा दिवस खर्ची घालावा लागतो. अशातच ऐनवली गावासह अन्य तीन गावातील नळपाणी योजनाच्या विहिरी वादळामुळे नादुरुस्त झाल्याने या चारही गावांवर पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. महसुल विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार या चारही विहिरींचे सुमारे ३५ लाख १५ हजारांचे नुकसान झाले आहे.
तौक्ते वादळामुळे तालुक्यातील १८ जिल्हा परिषद शाळा बाधीत झाल्या आहेत. यामध्ये फुरुस फळसोंडे शाळेचे पुर्ण छप्परच उडून गेले आहे. शिवाय किचन शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वर्गखोल्याही नादुरुस्त झाल्या आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद आहेत त्यामुळे तितकीसी अडचण नाही मात्र जूनमध्ये शाळा सुरु झाल्या आणि त्या आधी नादुरुस्त वर्गखोल्यांची दुरुस्ती झाली नाही तर विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे.