(मुंबई)
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी झाली. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दांत परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना खडसावले. शिक्षकांच्या निधीबाबत चर्चा सुरू असताना ही खडाजंगी पाहायला मिळाली.
गुरुवारी विधान परिषदेत शिक्षकांचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला, पण त्यांनी आपली बाजू मांडण्याऐवजी अनिल परब यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी ते मागील मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले, यामुळे नीलम गोऱ्हेनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली.
त्यानंतर, मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब ! ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का ? परत परत सभापती सांगताहेत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही, असा सवाल त्यांनी केला.
यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे, असे सांगितले. यावर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मंत्री काय ? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. आमदार प्रवीण दरेकर काय चाललंय हे? अहो शांत राहा आधी, असा संताप डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परीषदेत व्यक्त केला.