(मुंबई)
शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे साजरा झाला. शिंदे यांनी शिवसेना पक्षात केलेल्या बंडालाही आज वर्ष पूर्ण झाले. अत्यंत वाजतगाजत साजरा झालेल्या या सोहळ्याला राज्यातील शिवसेनेचे बहुतेक सगळे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही, तसेच आम्ही नव्हे तर ठाकरे यांनीच गद्दारी केली, असा आरोप शिंदे यांनी केला.
या सोहळ्यात सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, रामदास कदम यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात उपस्थित गर्दीला साक्षात दंडवत घालत शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, तुम्ही सहकार्यांमध्ये भांडणे लावायचेत, प्रतिस्पर्धी तयार करायचेत. आमची मजा बघायचे. आमचे फोनही उचलायचे नाहीत. आम्हाला घरगडी समजायचेत. कार्यकर्त्यांना मोठे करायचे नाहीत. पक्षप्रमुखांनी असे वागायचे नसते. त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करायचे असते. तरच पक्ष मोठा होतो. परंतु तुम्हाला तुमच्याच क्षमतेवर विश्वास नव्हता.
शिवसेनेसाठी हा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. कारण याच दिवशी गेल्या वर्षी क्रांती, उठाव केला. त्याची सगळ्या जगाने दखल घेतली. त्यानंतर आम्ही राज्यात सरकार स्थापन केले. त्याचाच आज जल्लोष होतो आहे. तो पुढचे अनेक दिवस साजरा करत राहा, असेही आवाहन शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. आगामी सर्व निवडणुका भाजपसोबत एकत्र लढवण्याची घोषणाही त्यांनी आपल्या भाषणात केली.
आपल्यावरील गद्दारीच्या आरोपाबद्दल शिंदे म्हणाले की, गद्दारी आम्ही नाही. तुम्हीच केलीत. तुम्ही युती म्हणून निवडणुका लढवल्यात. परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडलेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेची काँग्रेस होईल, तेव्हा माझे दुकान बंद करेन. परंतु तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेलात. मतदारांशी द्रोह केलात. आता तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. आम्हाला तुम्ही कचरा म्हणता. परंतु एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही आमच्यावरील आरोपांना कामाने उत्तर देऊ. बाळासाहेबांनी टपरीवाले, भाजीवाले, चहावाले, रिक्षावाले यासारख्या फाटक्या लोकांना घेऊन शिवसेना उभी केली. शिवसैनिकांनी जिवाला जीव देऊन, कष्ट करून, तुरुंगात जाऊन, रक्ताचे पाणी करून, प्रसंगी जीव धोक्यात घालून शिवसेना वाढवली. तिला बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळाले. त्यावेळी तुम्ही कुठे होतात, तुमच्यावर किती केसेस आहेत? मेहनत करून, रक्ताचे पाणी करून मी शिवसेना शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास केला, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, मला आजही आठवतंय, लोकसभेची निवडणूक होती. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र मी निवडणूक प्रचारात होतो. याचवेळी मला डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टरांचा फोन आल्यानंतर माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझ्या बाजुला लोकसभेचे उमेदवार गावित होते. त्यांनी मला निवडणूक सभांचं वेळापत्रक सांगितलं. मी त्यांना म्हटलं, सभा किती वाजता संपतील? ते म्हणाले रात्रीचे नऊ वाजतील.
आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतांना एकनाथ शिंदे भावनिक झाले. “पण त्यांना मी कसं सांगू की, माझ्या आईचा जीव गेलाय. माझी आई या जगात नाही. मी त्यांना (गावित) सांगितलं, आपण सभा पूर्ण करू. मी सभा पूर्ण करून आलो आणि रुग्णालयात आईचं अंतिम दर्शन घेतलं. ही मी चूक केली का? असे अनेक प्रसंग आमच्या नेत्यांच्या जीवनात घडले आहेत,” असं शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदेंनी मुलगा व खासदार श्रीकांत शिंदेंबाबतची एक जुनी आठवण सांगितली. डॉक्टर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी रुग्णालय बांधून देण्याची मागणी केली होती. पण बाप म्हणून मी त्याची मागणी पूर्ण करू शकलो नाही. रुग्णालय बांधायचा जेव्हा विचार करायचो, तेव्हा कोणती तरी निवडणूक यायची, अशी आठवण एकनाथ शिंदेंनी सांगितली.
ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो असलो तरी माझ्यात काही बदल झालेला नाही. मी काल कार्यकर्ता होतो. आज कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता राहीन. मी हेलिकॉप्टरमधून फिरतो, अशी टीका केली जाते. परंतु हेलिकॉप्टरने गावी गेल्यावर शेती करतो. तुम्ही सरकार चालवण्याऐवजी गाडी चालवत होतात. मी गाडीतून फायली घेऊन जातो. मी मंत्रालयात, गाडीत, रस्त्यात, ठाण्यात कुठेही असताना फायलींवर सह्या करतो. तुम्ही अडीच वर्षांत जेवढ्या सह्या केल्या नसतील, तेवढ्या सह्या मी एका दिवसांत केल्यात. तुम्ही पेनच जवळ ठेवत नव्हतात. तर मी दोन दोन पेन ठेवतो, असेही शिंदे म्हणाले.