(रत्नागिरी)
फसवणुकीच्या घटना एवढ्या वाढत असताना सुज्ञ नागरिकही यापासून सावध होताना दिसत नाहीत. आता अशीच एक घटना रत्नागिरीत घडली आहे. तुमचे वीज बिल अपडेट झालेले आहे असे सांगत प्ले स्टोअर वरून क्विक सपोर्ट अँप डाउनलोड करायला सांगत रत्नागिरी टीआरपी घागमठ येथे राहणाऱ्या महिलेची तब्बल 2 लाख 11 हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी ही फसवणूक केली असून या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता श्रीपाद नाटेकर (59, रा. टीआरपी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. सविता नाटेकर यांना 16 जुलै रोजी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन वरून बोलणाऱ्या राहुल चौधरी आणि दीपक शर्मा या दोघांनी नाटेकर यांना तुमचे वीज अपडेट झाले नसल्याचे सांगितले. बिल अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअर वरून क्विक सपोर्ट अँप डाउनलोड करायला सांगत नाटेकर यांच्याकडून कस्टमर आयडी, जन्मतारीख, नाटेकर यांच्या आईचे नाव आदि माहिती घेत त्यांच्या खात्यातील 2 लाख 11 हजार रुपये काढत त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाटेकर यांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रात दाखल केली आहे.