(रत्नागिरी)
विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला रिक्षा चालक अविनाश सुरेश म्हात्रे (४२) याच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली होती. मात्र, आत्महत्येपूर्वी त्याने केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत त्याने ‘त्या’ मुलीवर आरोप केले आहेत. ‘त्या’ मुलीने मला फसवले, ‘ती’ मुलगी आपल्याकडे पैशाची मागणी करत होती, म्हणूनच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. या व्हिडीओमुळे रिक्षा चालक म्हात्रे याच्या मृत्यूला वेगळे वळण लागले आहे.
रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याच्यावर एका कॉलेज युवतीने सोशल मीडियावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने अवघ्या काही तासांत रिक्षा चालकाला अटक केली होती. रिक्षा चालक म्हात्रे याला जामीन मंजूर होताच त्याने अवघ्या काही तासांत गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला आहे. या व्हिडीओत त्याने संबंधित मुलीवर गंभीर आरोप केले आहेत.
त्या मुलीने मला फसवले, ती मुलगी आपल्याकडे पैशाची मागणी करत होती. म्हणून मी आत्महत्या करत आहे. तिने माझ्याबद्दल भरपूर काही व्हायरल केलं आणि ती माझ्याकडे पैशाची मागणी करत होती, असे रिक्षा चालक म्हात्रे या व्हिडीओत बोलत आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांसमोर तपासाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.