(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेची जाहिरात मंगळवारी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी जनतेची पहिली पसंती एकनाथ शिंदे असल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातूनही जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख करण्यात आला आहे.
या जाहिरातीवर आता शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आज विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी छापून आणली, हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. चांगली गोष्ट आहे की, मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युतीचेच नेते आहेत,’ असे देसाई म्हणाले.
यासंदर्भात शिंदेसेनेने दिलेल्या जाहीरातीत केवळ शिंदे व मोदी यांचाच फोटो आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना २६ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३ टक्के लोकांनी पसंती दिल्याचे नमूद करण्यात आल्याने स्वत: फडणवीस व राज्यातील भाजप नेते मात्र नाराज झाले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द केल्याने नाराजीच्या चर्चेला खतपाणी मिळाले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनीही फडणवीस यांच्यापेक्षा आपल्याला अधिक पसंती असल्याची जाहिरात करणे योग्य नसल्याचे सांगत नापसंती व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला जाणार होते. मात्र फडणवीस यांनी अचानक आपला कार्यक्रम रद्द केला. कानाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना हवाई प्रवास टाळायला सांगितला असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले; मात्र जाहिरातीमुळेच ते कमालीचे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
या सर्व्हे आणि जाहिरातींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. अशी जाहिरात कधी पाहिली नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला पुन्हा हेच मुख्यमंत्री व्हावे,असं वाटत आहे. हे पाहून आनंद झाला, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. जनतेचा इतका पाठिंबा आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही? त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि मैदानात या. जनता कुणाच्या पाठीशी आहे हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळेल, असं थेट आव्हान अजित पवारांनी सरकारला दिलं आहे.
सरकारच्या आतापर्यंतच्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो होते, तर शिवसेनेच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो असायचा. यावेळी मात्र तसे झाले नाही. ज्या बाळासाहेबांच्या नावाने शिंदे राजकारण करीत आहेत त्यांचा फोटो जाहिरातीत नसणे याचा अर्थ आता शिंदेंची सेना ही मोदी सेना झाली आहे आणि शिंदेंचे दैवत आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.