रत्नागिरी : रत्नागिरीत प्रशासकीय इमारत होणार ही चांगलीच बातमी आहे. परंतु तीन वेळा भूमीपूजन झालेले आणि तीन वर्षे रखडलेले एसटी बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार, रत्नागिरी नगरपरिषदेची नळपाणी योजना पाच वर्षे सुरू आहे, ती कधी पूर्ण होणार असा सवाल सामान्य रत्नागिरीकरांच्या मनात आहे. जिल्हा रुग्णालयातील अंदाधुंदी कारभार, जि. प. मधील रिक्त पदे याकडे गांभिर्याने न पाहता दुर्लक्ष केले जात आहे. पायाभूत सुविधांची वानवा आहे. दौऱ्यामध्ये फक्त घोषणा होतात आणि भूमीपूजने होत आहेत, प्रत्यक्षात विकासकामे पूर्ण होत नाहीत, ही रत्नागिरीकरांची खंत आहे, असे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सत्ताधाऱ्यांवर आज टीका केली.
ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी प्रशासकीय इमारत होणार, अशी बातमी वाचनात आली. त्याकरिता निधीही दिला. निश्चित ही बातमी रत्नागिरीकरांसाठी चांगली आहे. परंतु रखडलेली कामे कधी पूर्ण होणार आणि अनेक योजनांमध्ये गोलमाल असल्याचे अनेकदा नागरिकांनीच उघडकीस आले आहे. एसटी बसस्थानक अपूर्ण असून त्यासमोरील एसटी बसेसचा थांबा येथे अजून निवारा शेड बांधलेली नाही. मंत्रीमहोदयांनी नगरसेवकांना याबाबत सूचना दिली होती. परंतु ती का पूर्ण झाली नाही, याचे उत्तर ते विचारत नाहीत.
रखडलेल्या विकासकामांबाबत न बोलता फक्त प्रशासकीय इमारतीच्या घोषणा होत आहेत. मांडवी पर्यटन, बंद सौरदिवे, मिरकरवाडा जेट्टीचे काम अपूर्ण, मिऱ्या बंदरचे बंधारा काम अपूर्ण आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, आंबा बागायतदार, महावितरणच्या बिलांबाबत जनतेत नाराजी आहे. जि. प. पदे मध्ये शेकडो पदे रिक्त आहेत. नवीन डांबरीकरणाच्या घोषणा करण्यापलिकडे विकास काही जात नाही. याकरिता मंत्रीमहोदयांनी दर आठवड्याला आढावा बैठक घ्यावी. परंतु ते दौऱ्यावर येतात, रस्त्यांची उद्घाटने करतात आणि स्थानिक आमदार निधीतून कामांचे नारळ फोडतात. परंतु डांबर विकास यापलीकडे काम झालेले नाही, अशी खिल्ली पटवर्धन यांनी उडवली.
मंत्रीमहोदय वाशिष्टीला पाहिजे तेवढा निधी देणार आहेत. परंतु रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे तीन वेळा भूमीपूजन झाले त्याची आज काय अवस्था आहे, हे पाहिले का. वाशिष्टीप्रमाणे रत्नागिरी मतदारसंघातही विकासकामे रखडली आहेत. आपण शासनाचे जबाबदार प्रतिनिधी आहात, त्यामुळे जनताभिमुख काम होणे अपेक्षित आहे. आलिशान बंद खोलीतून सूत्रे हलतात, पण अशी सुत्रे विकासकामांसाठीही हलवण्यात यावीत, अशीही अपेक्षा अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.