(राजापूर)
ताम्हाने नदीपात्रात स्नानासाठी आपले मित्र आणि भावांसह उतरलेल्या २३ वर्षीय युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील मयत युवकाचे नाव प्रफुल्ल सुभाष पवार असे असून तो मूळ ओशिवळे गावचा रहिवासी असून विक्रोळी, मुंबई येथे वास्तव्याला होता.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवळे येथील खालची गुरववाडी येथे मयत पवार याचे घर असून तो मुंबईतील विक्रोळी येथे रहात होता. शनिवारी सायंकाळी ३. ३० मयत तरुण प्रफुल्ल सुभाष पवार हा त्याचे भाऊ आणि मित्र यांच्या समवेत ताम्हाने नदीमध्ये कृषी बंधाऱ्याजवळ आंघोळीसाठी उतरले याचदरम्यान नदीला पाणी देखील वाढले होते.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर प्रफुल्ल वाहून गेला होता. त्या नंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा शोध घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि नंतर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तो मृत झाला असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची खबर सागर संभाजी पवार यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेतील मयत प्रफुल्ल सुभाष पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.