(जाकादेवी/वार्ताहर)
स्वामी विवेकानंदांच्या मनातील युवक घडवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील श्री. केदार कुंभार सर यांनी संजीवनी कोचिंग सेंटरची स्थापना केली. कोचिंग सेंटरच्या माध्यमातून केदार कुंभार सर यांनी अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांंसह अनेक स्तरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गुणवत्ता संपादन करुन संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली या कामगिरीची दखल घेत ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण गणपतीपुळे येथे रविवारी ३ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
विचारवंत अविनाश धर्माधिकारी सरांच्या कार्याने केदार कुंभार प्रभावित झाले. केदार सर अविनाश धर्माधिकारी सरांना गुरूस्थानी मानून आपल्या दिवसभराच्या कामकाजाला सुरुवात करताना दिसतात. आजही केदार कुंभार आपल्या गुरूंना वंदन करूनच दिवसाची सुरुवात करतात.भारतातील हाच गुरू शिष्य परंपरेचा विचार हृदयात घेऊन केदार कुंभार यांनी संजीवनी कुटुंबात आजवर असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. संजीवनी कुटुंबात गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन ते देत आले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रखर बुध्दीमत्ता व मार्गदर्शनाचा अभाव लक्षात घेऊन केदार कुंभार यांनी ग्रामीण भागातच आपले लक्ष केंद्रित केले.अविरतपणे ७ वर्षे त्यांनी खेडोपाड्यात उल्लेखनीय व अनुकरणीय शैक्षणिक काम केले.केदार कुंभार यांनी शेकडो मुले बोर्डात चमकवली.अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून दिली. त्यांच्या अनेक अध्ययनार्थींनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांत देदीप्यमान यश संपादन करुन संजीवनी क्लासेसची उज्वल परंपरा अबाधित ठेवली.
नुकत्याच पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय वेदिक गणित स्पर्धेत ‘केदार कुंभार सर यांचे २५ विद्यार्थी जगभरातील गुणवत्ता यादीत चमकले. स्पर्धेची पुढील दिशा वेळीच लक्षात घेऊन संजीवनीमध्ये वैदिक गणितचे प्रशिक्षण ते मुलांना देत आले आहेत.त्यांचे गणितीय क्षेत्रातील झेप लक्षात घेऊन केदार कुंभार यांना यापूर्वी दी गुरू एज्युकेशन इंडियातर्फे वैदिक गणित बेस्ट टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री.कुंभार यांनी शिकवलेलं विज्ञान आणि गणित म्हणजे मुलांसाठी जणू पर्वणीच होय. श्री.कुंभार सर, यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील मुले इंग्रजी सहजपणे बोलताना दिसतात. अध्यापन करताना ते आवर्जून सांगतात की जमल्यास संस्कृत,स्पॅनिश इ.भाषा ही शिका. संजिवनी कुटुंबात आज वैदिक गणित,DMIT, Abacus, इयत्ता 8 ते 10 , इयत्ता 11-12 ( विज्ञान ) ,NEET, स्पर्धा परीक्षा इ. मार्गदर्शन दिले जात आहे
संजीवनी कुटुंबात अगदी झोपडपट्टीतील मजुरांची मुले ते अधिकाऱ्यांची ,राजकारण्यांची मुले शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे की गरीब मुलांचे ते पालकत्व स्वीकारतात. दोन वेळेचे जेवण न मिळणारी मुले मात्र त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.अशा मुलांची शिक्षणाची जबाबदारी ते स्वतः घेतात. सरतेशेवटी निरोप घेताना मुलांसह पालकांचेही डोळे गच्च पाण्याने भरतात.
Reading is next to breathing ही गुरूंनी दिलेली शिकवण केदार कुंभार यांनी आपल्याही विद्यार्थ्यांत अगदी खोलवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना ते दिसतात.म्हणूनच मुलांसाठी संजिवनीमध्ये श्री.केदार सर यांनी मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय उघडून ज्ञानाच्या कक्षा विस्तारित केल्या आहेत.
सध्या रत्नागिरी मधून देशभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे सेवा कार्य संजीवनीमार्फत सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांचे सदैव हित पाहून विद्यार्थ्यांंसाठी अहोरात्र झटणाऱ्या केदार कुंभार या शिक्षकांना गरुड झेप हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे