(राजापूर)
गुरूवारी 1 जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तळवडे पैकी वाकाडवाडी येथील ग्रामस्थ सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती तलाठी अजित पाटील यांनी राजापूर वनपाल सदानंद घाटगे यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्कु टीमने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता खाद्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडलेला असल्याचे निदर्शनास आले. या विहिरीला कठडा नाही तसेच विहीर जवळपास तिस फुट खोल असुन घेरी पंधरा फूट आहे. विहिरीचा काठ ठिसूळ असुन सतत माती व दगड पडत होते. विहिरीमध्ये बिबट्या व मांजर दिसुन आले मात्र मांजर मृत होते. यानंतर तातडीने बिबट्याला पिंजऱ्यात घेणेसाठी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर जवळपास दोन ते अडीच तासानंतर दुपारी 12. 25 वाजता बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आले.
विहिरीत पडलेल्या बिबटयाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप विहिरीबाहेर काढून वनविभागाने जीवदान दिले आहे. विहिरीबाहेर काढलेल्या या बिबटयाची वैद्यकिय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुमारे सहा महिने वयाची ही बिबट्याची मादी होती. तशी माहिती रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे वाकाडवाडी येथील ही घटना आहे.
सदर बिबट्या हा साधारण सहा महिने वयाचा असुन ती मादी जातीचा आहे. पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्याकडून या बिबटयाची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दिपक खाडे व चिपळूण सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्या सुरक्षितपण नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या रेस्कु ऑपरेशन मध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार ,रत्नागिरी वनरक्षक प्रभु साबने, रेस्कु टीम राजापूरचे दिपक म्हादे, विजय म्हादे, गणेश गुरव, प्रथमेश म्हादे, निलेश म्हादे, तळवडे सरपंच गायत्री साळवी, पोलिस पाटील शितल कोटकर, तंटामुक्त अध्यक्ष शिवराम कोटकर , महिला दक्षता कमिटी पोलिस स्टेशन राजापूरच्या धनश्री मोरे, रायपाटण दुरक्षेत्राचे पोलीस हेडकाँस्टेबल कमलाकर पाटील, सुजित पाटील , नितीन भानवसे , तसेच पत्रकार तुषार पाचलकर, सुरेश गुडेकर, दया सुतार व इतर ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.