(चिपळूण)
गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय गाजत आहे. येथील नगरपालिकेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आहेत. त्यातील दोन अधिकारी दिव्यांग असल्याने त्यांना ताप्रती स्थगिती दिली आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे आणि प्रमोद ठसाळे यांची केडर अंतर्गत परजिल्ह्यात बदली झाली. त्यानुसार मोरे हे महाड पालिकेत रुजू झाले आहेत.
मे महिन्यात पालिकेतील केडर अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पालिकांना प्राप्त झाले होते. मात्र या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असल्या तरी त्यांना संबंधित बदलीचे आदेश पालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे गेले तीन महिने झालेले अधिकारी तेथेच कारभार पाहत होते. मात्र राज्य शासनाच्या निदर्शनास ही बाब येताच पालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी बदल्यांचे आदेश जारी केले. बदलीचे आदेश देऊन देखील त्याठिकाणी हजर न झालेल्या अधिकाऱ्यांना संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, तसा अहवाल शासनाला सादर करावा. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील कोणतीही सबब न सांगता पदस्थापनेच्या ठिकाणी हजर राहून अहवाल द्यावा. असे न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन मुख्याधिकाऱ्यांनी अदा करू नये, असे आदेशात म्हटले आहे.
संबंधित अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत, तर शासन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. आयुक्त स्तरावरावरून दखल घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी जिल्हास्तरावरून तत्काळ कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार येथील प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे हे महाड येथे रूजू झाले असून प्रमोद ठसाळे हे रोहा येथे रूजू होण्याची शक्यता आहे.