(रत्नागिरी)
निवडणुकीत काय होईल हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु, नशिबात असेल तर माझ्यासह माजी आमदार बाळ माने यांनाही तिकीट मिळेल असे सूतोवाच निलेश राणे यांनी केले. निलेश राणे शेवटपर्यंत बाळ माने यांच्यासोबत उभा असेल, असे जाहीर पाठबळ देत रत्नागिरीसाठी त्यांनी वेगळेच संकेत दिले.
राजकीय संन्यासाचा निर्णय मागे घेतल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राणे म्हणाले, रत्नागिरीने मला भरभरून दिले आहे. परंतु, आपण वॉरझोनमध्ये असतो, तेव्हा मागेपुढे पाहात नाही. आज काही गोष्टीचा निकाल लागला नाही तर पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. मैदानी कार्य कसे करायचे हे चांगले अवगत आहे, आता तुम्ही कामाला लागा, असे आदेश कार्यकत्यांना दिले. यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थित कार्यकर्त्यांची मने जिंकली. हातीवलेपासून रत्नागिरी पर्यंत झालेल्या स्वागताचा उल्लेख करत निलेश राणे म्हणालेकी, कार्यकर्त्यांनी केलेले हे स्वागत हे त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. याच कार्यकर्त्यांमुळे आज २०१४ नंतरही निलेश राणे राजकीय व्यासपीठावर उभा आहे. त्यांनी इथे रत्नागिरीत परत परत बोलावले, काहीही अपेक्षा न ठेवता केवळ प्रेम दिले. कार्यकर्तेच पक्षाला बळकट करत असतात. या कार्यकर्त्यांनाच जपलं पाहिजे.
रत्नागिरीत दाखल होताच दणक्यात स्वागत
प्रदीर्घ काळानंतर माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. हातखंब्यापासून जयस्तंभापर्यंत स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, हातखंबा येथे फटाक्यांच्या आतषबाजी, भलामोठा पुष्पहार आणि फुलांची पुष्पवृष्टीने हात खंब्यात दणक्यात कार्यकर्त्यांनी राणेंचे स्वागत केले. तसेच जयस्तंभ परिसरात ही क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार घालून नीलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळ माने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रदेश निमंत्रित सदस्य अशोक मयेकर, ज्येष्ठ विधीतज्ञ बाबासाहेब परुळेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागलेकर, प्रत्येक सेलचे अध्यक्ष पदाधिकारी तालुकाध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.