ठाकरे सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. याच ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की समाज शांत आहे म्हणजे तो सहनशील आहे. जेंव्हा उद्रेक होईल तेंव्हा या ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे, अशी तिखट प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मराठा आरक्षण एल्गार सभेचे प्रणेते निलेश राणे यांनी दिली आहे.*
मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटलं नाही, कारण ठाकरे सरकार असेपर्यंत आरक्षण मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही नव्हते. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे गेल्यावेळीच मी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा पवार साहेब असोत त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची ईच्छाच नव्हती. ते कधीही मराठयांच्या बाजूने बोलले नाहीत, असं ते म्हणाले.
ठाकरे सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना रस्त्यावर आणण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असं सांगतानाच ते पुढे म्हणाले की, मराठा समाज शांत आहे याचा अर्थ असा नव्हे की, तो सहनशील आहे. जेंव्हा उद्रेक होईल तेंव्हा ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना लापायलाही जागा मिळणार नाही. हे लक्षात ठेवावे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा, पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.