मुंबई आणि महाराष्ट्रातील कोविडची स्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. परंतु, तशा प्रकारे जाहीर करण्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो! मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी. न्यायालयाने केलेल्या कौतुका मुळे मुंबई महापालिका आणि सरकारचे इतर गोष्टींमधील अपयश झाकले जाणार नाही, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारवर केला आहे.
काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय सुविधांसंदर्भात फोनवर चर्चा केली त्यावेळी पंतप्रधानांनी राज्याच्या कोरोना विरोधातील लढाईविषयी कौतुक केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.
श्री. दरेकर म्हणाले, आजही मुंबईमध्ये ऑक्सीजन बेडस,वेंटीलेटरची कमतरता असताना साध्या-साध्या औषधांचाही तुटवडा जाणवतो आहे. तरी देखील राज्यात सर्व सुरळित असल्याचं ठाकरे सरकार सांगते आहे. मग रुग्णांना बेड का मिळत नाहीत,ऑक्सिजनचा तुटवडा अनेक जिल्ह्यात का आहे ? बेड किंवा ऑक्सिजनसाठी आम्हाला दररोज अनेक फोन येतात. काल लातूर येथील एका कर्मचाऱ्याने मुंबईत बेड मिळत नसल्याचे फोन करून सांगितले. बेड न मिळाल्याने त्याला लातूरला परत जावे लागले.
सुप्रीम कोर्टाने ऑक्सीजनच्या नियोजनाबाबत मुंबई महापालिकेचं कौतुक केलं. याबाबत दरेकर म्हणाले, आम्ही सुद्धा मुंबईकर आहोत, मुंबईचं कौतुक झाल्यास आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरेल. परंतु, अशा गोष्टी राजकीय अभिवेशनातून,प्रसिद्धी मिळवण्यासाठी पसरवल्या जात आहेत, हे मुंबईकरांना ठाऊक आहे. यामधून राज्यातील अपुरी आरोग्य व्यवस्था, बेडस,रेमडेसेवीरची कमतरता या गोष्टी झाकल्या जाणार नाहीत. न्यायालय एखाद्या विशिष्ट मुदयाच्या आधारे आपलं मत देत असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीबाबत कौतुक झालं म्हणजे अन्य गोष्टीतील अपयश झाकलं जाईल, अशा भ्रमात मुंबई महानगरपालिकेने आणि सरकारने राहू नये, अशी टीका दरेकर यांनी केली.