खेड : खेड तालुक्यातील कुळवंडी येथे 2015 सालच्या निवडणुकीत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. यामध्ये 17 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेड येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाचा गेली 7 वर्षे खटला चालू होता. या खटल्यात तक्रारदारानेच आपला जबाब बदलल्याने न्यायालयाने 17 संशयितांची निर्दोष मुक्तता केली.
प्रकरण असे की, 2015 साली संतोष दत्ताराम खोपकर हे कुळवंडी गावातील प्रभाग 3 मधून ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. या ग्रामपंचायतीचा निकाल 23 एप्रिल 2015 रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत संतोष खोपकर यांचा पराभव झाला होता. याच दिवशी सायंकाळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत हे 17 संशयित आरोपी सहभागी झाले होते. ही मिरवणूक खोपकर यांच्या घराजवळ आल्यावर संशयितांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ केली, अशी संतोष खोपकर यांनी खेड येथील पोलीस स्थानकात दिली होती.
या प्रकरणाचा तपास डीवायएसपी भोसले यांनी केला होता. न्यायालयासमोर 17 संशयितांविरुध्दचे दोषारोपपत्र ठेवण्यात आले. यावेळी खोपकर यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे जबाब न्यायालयापुढे नोंदवला नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार खोपकर यांच्या मुलाच्या जबाबातही विसंगती आढळल्याने न्यायालयाने सर्व 17 संशयितांची निर्दोष मुक्तता केली.
अनिल निकम (58), अमित निकम (29), अजित निकम (28), मुकेश निकम (43), संदेश चं. निकम (33), संदेश ब. निकम (30), संजय निकम (52), नीलेश निकम (31), गणेश निकम (26), चंद्रकांत मोरे (30), मनोज पवार (32), अक्षय निकम (27), सत्यवान निकम (48), वैभव निकम (30), शरद निकम (49), विश्वास शिर्के (42), अनिल कोकरे (39, सर्व रा. कुळवंडी, खेड) अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत.