(नवी दिल्ली)
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य विभागाकडून रविवारी नवे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. ही नवी नियमावली ओटीटी माध्यमांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या नियमांनुसार आता ओटीटी माध्यमांना तंबाखू विरोधी इशारा देणे अनिवार्य असणार आहे. तसेच ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांमध्ये नव्या नियमांचे पालन न केल्यास केंद्रीय आरोग्य विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाकडून जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यानंतर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार आमि सोनी लिव्ह यांसारख्या ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांसाठी तंबाखू विरोधात इशारा देणे अनिवार्य असणार आहे. चित्रपट आणि टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या सूचना दाखवणे आधीच अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये चित्रपट आणि कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि मध्ये कमीत कमी तीस सेकंद तंबाखूविरोधात इशार्याची जाहिरात दाखवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ओटीटी माध्यमांना सेन्सॉर नसल्यामुळे अनेक वादग्रस्त गोष्टी या माध्यमांवर दाखवल्या जातात. या माध्यमांचा वापर करणारी तरुण पिढीची संख्या भारतात अधिक आहे. या गोष्टींचा विचार करुन केंद्रीय आरोग्य विभागाने ओटीटी माध्यमांसाठी हे नियम लागू केले आहेत.