तूर्की आणि सीरियातील भूकंपातील मृतांचा आकडा २२ हजारांवर पोहचला आहे. बचाव पथकाकडून अजूनही ढिगारे आणि मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. गेल्या अनेक तासांपासून या खाली असलेले मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे. भूकंपानंतर आता फक्त गेल्या अनेक तासांपासून इमारतींच्या मलब्याखाली तसेच ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचं तुर्कीचे पंतप्रधान रेचेप तय्यब अर्दोआन यांनी म्हटलं आहे.
युरोप, आशियासह अमेरिकेनं तुर्कीला संकटकाळात मदतीचा हात दिला आहे. अनेक देशांचे बचावपथक तुर्कीत दाखल झाले असून आवश्यक साहित्य लोकांपर्यंत पोहचवले जात आहेत. तुर्कीतील सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान आणि किलीस या शहरांमध्ये भूकंपामुळं सर्वात जास्त जीवीत आणि वित्त हानी झालेली आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीने काही सॅटेलाईट इमेजीस (उपग्रह छायाचित्रे) प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये प्रलंयकारी विध्वंस आणि निवाऱ्यासाठी बनवलेले तंबू दिसून येत आहेत. तसेच मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू असल्याचेही स्पष्ट होत आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २२००० लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, जखमींची संख्या 50 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. बेघर झालेल्यांसाठी निवारा व्यवस्था उभी करण्यासाठी प्रशासनाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सीरियातही मृतांना दफन करण्यासाठी सामूहिक कबरी बांधल्या जात आहेत. येथे मदत करणाऱ्या व्हाईट हेल्मेटच्या टीमने एक व्हिडिओ शेअर करत मृत लोकांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार केले जात असल्याचे सांगितले. तुर्कीमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्यासाठी 60 हजारांहून अधिक बचावकर्ते तैनात करण्यात आले आहेत.
भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत सहावे विमान तुर्कस्तानला पाठवले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. बचाव कर्मचारी, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे, श्वान पथकासह विमान तुर्कस्तानला रवाना झाले आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमसोबत गरुडा एरोस्पेस कंपनीचे ड्रोनही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तुर्कस्तानमध्ये भूकंपानंतर एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. तसेच 10 भारतीय तुर्कस्तानच्या दुर्गम भागात अडकले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
तुर्कस्तानमध्ये सोमवारी झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने तुर्कस्तानची जमीन 10 फूट म्हणजेच सुमारे 3 मीटरने सरकली आहे. इटालियन भूकंपशास्त्रज्ञ डॉ कार्लो डोग्लियानी यांनी हा दावा केला आहे. भूकंपानंतर जमिनीचा भाग सरकण्याच्या या प्रक्रियेमुळे पाणी-पेट्रोल लाईन आणि नद्यांची दिशा बदलू शकते, असेही सांगितले जात आहे. यापूर्वी 2011 मध्ये जपानमध्येही असे प्रकार दिसून आले होते.