(पुणे)
ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणी नऊ पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. याप्रकरणी पीएसआय जनार्दन काळे, मोहिनी डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव हवालदार आदेश शिवणकर नाईक, नाथाराम काळे शिपाई पिरप्पा बनसोडे, आमित जाधव अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
अमली पदार्थांच रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील सोमवारी रात्री उपचारांदरम्यान नाट्यमयरित्या ससून रुग्णालयातून पसार झाला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. ललित पाटीलचे मोठे ड्रग्ज रॅकेटच उघडकीस आले असते, मात्र तो पळून गेल्यामुळे मोठ्या कारवाईला मुकावे लागले. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटील हा ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी होता. ललित हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला होता. याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली. कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे. ललितने “प्लॅन’ आखून पलायन केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीत प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता होती, अशीही चर्चा आहे.
निलंबित केलेले अधिकारी आणि कर्मचारी :
ASI – जनार्दन काळे, PC – विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे दिगंबर चंदनशिवे, PSI – मोहिनी डोंगरे, हवालदार – आदेश शिवणकर नाईक – नाथाराम काळे, शिपाई – पिरप्पा बनसोडे, आमित जाधव