(संगमेश्वर / वार्ताहर)
तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथील आरुष राजीव चव्हाण हा डॉ. होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकला आहे.
बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन आयोजित शास्त्र प्रज्ञाशोध लेखी परीक्षेत तो गुणवत्ता यादीत आला आहे. यामुळे त्याची पुणे येथे २२ जानेवारीला होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. तो पी. एस बने विद्यालय येथे इयता ६ वी इयत्ता मध्ये शिकत आहे.
डॉ. होमिभाभा बालवैज्ञानिक लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी येथे पार पडली होती. त्याच्या या यशाने शाळेतील शिक्षकवर्ग, परिसरातील नागरिकांनी कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर दिली. त्याला या यशात त्याची आई मृणालिनी चव्हाण, वडील राजीव चव्हाण, शाळेतील शिक्षक यांनी बहुमोल मार्गदर्शन केल्याचे सांगितले.
याआधी सुद्धा त्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये नॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड, गणित ऑलिंपियाड, नवोदय परीक्षा यामध्ये क्रमांक पटकावला आहे. त्याला अभ्यासात विशेष गोडी असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. तसेच त्याला यापुढे विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले.