(मंडणगड)
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवेचे सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘कामगार कायदे काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानमालेला महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वकील अनिल कुंभार, जिल्हा सत्र न्यायालय सांगली उपस्थित होते. या व्याख्यान मालेतील दुसरे पुष्प वकील अनिल कुंभार यांनी गुंफले. ‘कामगार कायदे काल, आज आणि उद्या’ या विषयावर आपल्या व्याख्यानातून वकील अनिल कुंभार यांनी कामगार कायद्याची संकल्पना, कामगार कायद्याची उत्पत्ती, भारतातील वेगवेगळे कामगार कायदे, कामगार कायद्यांमधील बारकावे, समस्या अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला.
व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचे सत्रही रंगले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सहा. प्रा. सायली घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रा. अनिता पाटील यांनी केले. या वेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.