( रत्नागिरी/प्रतिनिधी )
जागतिक स्तरावरील विद्वानांमध्ये गणल्या जाणार्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुतांशी समाजोपयोगी लेखन हे इंग्रजीत व अप्रकाशित असून अद्यापही ते प्रकाशनाच्या वाटेवर घुटमळत आहे. राज्याच्या प्रकाशन समितीवर अनेक धुरंधर नेत्यांनी काम केले. मात्र संपूर्ण साहित्य अद्यापही प्रकाशित झालेले नाही. हेच कार्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी आपल्या खांद्यावर घेतले असून त्या संदर्भातील बैठक नुकतीच जिल्ह्याच्या अल्पबचत भवन येथे संपन्न झाली. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. इतर राज्यांनी यापूर्वीच आपापल्या भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित केले. मात्र पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्र राज्य मात्र यात मागे का राहिले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे भान देणार्या राज्यघटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौखिक आणि लिखित साहित्य राज्य शासनाने खंड स्वरूपात इंग्रजीत प्रकाशित केले आहे. शासनाने प्रकाशित केलेल्या 22 खंडांपैकी केवळ 5 खंड मराठीत भाषांतरित झाले आहेत. उर्वरित 16 खंड भाषांतराच्या प्रतिक्षेत आहेत. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी हे खंड त्या-त्या राज्यांतल्या भाषेत यापूर्वीच प्रकाशित केले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या भूमीतून देशाला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीत प्रदीर्घ काळ उपलब्ध नव्हते. राज्य शासनाने आता उर्वरित 16 खंडांचे मराठीत भाषांतर करण्याचे मनावर घेतले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 वा खंड प्रकाशन समारंभाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात पार पडली. या बैठकीत प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकाचीच सभागृहात जोरदार चर्चा रंगली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड मराठी भाषांतर खंड 6 या प्रकाशनच्या नियोजनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उस्थितीत बैठक पार पडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, साहित्य प्रकाशित करताना विविध सामाजिक संघटना यांना परिपत्रकाद्वारे बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विविध स्तरावरील नेते, सामाजिक कार्यकर्ते सदर बैठकीस उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीत भाषांतर करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे मूळ लेखन उद्देशाला धक्का न पोहोचवता भाषांतर करण्यात यावे, या संदर्भात उपस्थितांमध्ये सखोल चर्चा घडून आली. अनेकांनी आपली मते मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाप्रती जागतिक स्तरावर कशाप्रकारे अभ्यास केला जातो, यावरही मते मांडण्यात आली.
कार्यतत्पर, कर्तृत्ववान अशा ना.उदय सामंत यांच्याकडे प्रकाशन समितीची जबाबदारी आल्याने आता या कामाला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्यासह विविध विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.