डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने सुरू केले ते प्रबुद्ध भारत मासिक. या मासिकाचे रत्नागिरी तालुक्यातील पहिले वाचक व वर्गणीदार लाजूळ गावचे ९३ वर्षाचे रघुनाथ उर्फ भाऊ सावंत होय. विशेष म्हणजे भाऊंचे वडील कमलाकर गोविंद सावंत हे १९२७ सालच्या चवदार तळ्याचे सत्याग्रही होते. विद्यार्थी दशेपासून ते आजतागायत बुद्ध फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या वाचनातून त्यांनी आपल्या जीवनाला गती दिली. रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून रघुनाथ उर्फ भाऊ सावंत यांना ओळखले जाते.
भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास, पेरियार ,महावीर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, याशिवाय संतवाड्मय आणि बालपणी रामायण ,महाभारत ,पांडव प्रताप अशी पुस्तकेही वाचून त्यातील सार ते आपल्या भाषेतून सहजपणे उलगडतात. खरं तर बालपणी वाचनाची आवड भाऊंचे वडील कमलाकर गोविंद सावंत यांनी लावली होती.
१९३१ साली रघुनाथ कमलाकर सावंत यांचा रत्नागिरी- लाजूळ या निसर्गरम्य छोट्या गावात त्यांचा जन्म झाला.विद्यार्थी दशेपासूनक वाचनाकडे त्यांचा प्रचंड कल होता.कारण त्यावेळी आंबेडकरी चळवळीचा राज्य,देशभरासह जगभरात वैचारिक क्रांतीचा झंझावात सुरू होता.
आजच्या युवक पिढीने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.आजची पिढी खूप प्रगत आहे हे आपण मान्य केलेच पाहिजे, आणि ते खरंही आहे. पण दुसऱ्या बाजूला आताच्या पिढीत वाढती व्यसनाधिनता, स्वैराचार देखील पाहायला मिळतो.याला जबाबदार कोण? सामाजिक व्यवस्था की आधुनिकीकरण? भाऊ सावंत सांगतात ,की वेवेकी विचार येण्यासाठी, मानवी जीवनात शिस्त येण्यासाठी, संसार सुव्यवस्थित चालण्यासाठी,मुला-मुलींवर चांगले संस्कार होण्यासाठी वाचन संस्कृती फार मोठे परिवर्तन घडवून आणू शकते.म्हणून प्रत्येकाने वाचन संस्कृती जपलीच पाहिजे.मौजमजा समजून जीवन जगण्यापेक्षा महापुरुषांची विचारसरणी अंगिकारुन जीवन जगण्यात खरे सुख असते.
रघुनाथ सावंत कोंकणातील बौद्ध संस्कृती संदर्भात एक अतिशय अभ्यासपूर्ण आकलन असलेले व्यक्तिमत्त्व होय.आजपर्यंत एक हजार पेक्षा जास्त पुस्तकं तर अनेक निवडक दुर्मीळ ग्रंथांचे त्यांनी वाचन केले आहे.आजच्या अभ्यासू व्यक्तींपुढे ते आत्मविश्वासाने बोलताना अनेक पुस्तकांतील संदर्भ देतात.बोलताना त्यांच्या नजरेत विशेष अशी चमक जाणवते. लेखन करताना मात्र त्यांचे हात आज काहीसे थरथरतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीच्या वाचनातून अंगी भिनलेले भाऊ सावंत अनेकांचे मार्गदर्शक आहेत. काबाडकष्ट करून हालअपेष्टा सोसून मुलांना चांगले शिक्षण देऊन आपला संसार नेटानं उभा केला. आज भाऊंची मुले विविध क्षेत्रात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. या वयातही भाऊ तीन चार किलोमीटरचे अंतर सहज चालतात. या यशस्वी वाटचालीत त्यांची सुविद्य पत्नी पुष्पलता सावंत यांची या कुटुंबाला मोठी साथ लाभली. वाचनामुळे आहार विहार याविषयी त्यांच्याकडे खूप माहिती आहे.वयाची नव्वदीनंतरही ते आपली कामे स्वतः करतात तेही अगदी आनंदाने. आजही वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठापासून ते शेवटच्या पानावरील ते सर्व बातम्या बारकाईने वाचतात.
रघुनाथ सावंत १९५१ च्या दरम्याने नोकरीच्या निमित्ताने प्रथमच मुंबई येथे गेले होते. येथून तीन चार वर्षानंतर ते परत गावी आले.गावी आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते दिवसभर दगड तोडून , अंगमेहनत करून घरी आल्यानंतर ते सायंकाळी आंघोळ केल्यानंतर सलग दोन तीन तास पुस्तकांचे वाचन करण्यात ते गढून जात. सकाळी कोंबडा आरवताच पहाटे उठून पुन्हा वाचन. वाचन हा छंद जोपासत वाचन हे त्यांचे अंग बनून गेले. निरंतर वाचनातून ते एक व्यासंगी विचारवंत, वक्ते बनले. भाषण करताना ते सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर ते परखडपणे भाष्य करतात. विचारलेल्या प्रश्नांना ते मार्मिकपणे उत्तर देतात. अतिशय संयमी, प्रेमळ स्वभावाचे भाऊ अनेकांचे दिशादर्शक ठरतात.रघुनाथ कमलाकर सावंत हे आजही धार्मिक पूजा पाठामध्ये रममाण होऊन समाजाचे प्रबोधन करतात.
आजच्या तरुण पिढीला संदेश देताना ते म्हणतात की, आजच्या तरुणांनी वाचनाकडे वळले पाहिजे, टीव्हीवरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मालिकांमध्ये गुंतू नये. मोबाईलचा अतिरिक्त वापर करू नये.सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत सहभागी होण्यासाठी ते आग्रह धरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करा असा संदेश देतात.
रत्नागिरी जिल्ह्यात बॅरिस्टर होण्याचे प्रमाण का घटले? बॅरिस्टर होणे काळाची गरज असल्याचे ते सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोठ्या प्रमाणावर इंग्रजीतून लिहिले गेले आहे.त्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाकडे वळण्याची गरज आहे.त्यामुळे जागतिक घडामोडी समजून येतील.आजचा विद्यार्थी मागे पडणार नाही असे ते आजच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सल्ला देतात. आजच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, बॅरिस्टर व्हावे, मोठ-मोठ्या पदांवर काम करावे,उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,असे ते अनेकांच्या मनावर ठसवतात.आदरणीय रघुनाथ उर्फ भाऊ सावंत यांच्या वाचन संस्कृतीच्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा…!!!
शब्दांकन : संतोष रामचंद्र पवार, जाकादेवी.
मो. 9423049983