(वैभव पवार / गणपतीपुळे)
बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात रक्ताचे पाणी करून कोट्यवधी अनुयायांसाठी महनीय त्याग केला. मानवी उद्धारासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भगवान बुद्धाच्या विज्ञाननिष्ठ धम्माची दीक्षा घेऊन आपल्या अनुयायांना परिवर्तनवादी विचार देऊन आपले कल्याणकारी जीवन जगण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर बौद्ध अनुयायांकडून बुद्धाच्या धम्माचे आचरण परिपूर्णरित्या केले जात नसल्याचे दृष्टीस येत आहे. आजच्या बौद्ध समाजाने तथागत भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्याआधी महामानव डॉ. बाबासाहेबांचे क्रांतिकारक महान व्यक्तिमत्व तसेच बाबासाहेब यांचे मानवतावादी मौलिक विचार समजून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन बौद्ध धम्मगुरू भंते संघराज यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील गडनरळ बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ७ आणि बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा व संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास सांगता समारंभात धम्मदेसना देताना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेबांचे सर्वव्यापी महान राष्ट्रीय कार्य उपस्थितांसमोर मांडताना विविध प्रासंगिक उदाहरणे देऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात परिवर्तन करून बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अतिशय सोप्या भाषेत बाबासाहेबांच्या त्यागी जीवनाबद्दल, त्यागी कार्याबद्दल आणि मौलिक विचारांबद्दल अत्यंत उद्बोधक असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडनरळ बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.७ यांच्यावतीने उपस्थितांचे यथोचित स्वागत करण्यात आले.त्यानंतर गडनरळ शाखेचे अध्यक्ष विजय सावंत व महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगता समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भंते संघराज व तालुका शाखेचे प्रमुख पदाधिकारीचे आणि सर्व सहकारी यांच्या हस्ते आदर्शांसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर बौद्ध धम्मगुरू भंते संघराज यांनी उपस्थितांना त्रिसरण- पंचशील दिले. त्यानंतर या कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या वतीने भंते संघराज यांचे स्वागत करून त्यांना धम्मदान प्रदान करण्यात आले. या वर्षावास सांगता समारंभाचे अतिशय नेटके नियोजन केल्याबद्दल गडनरळ गावशाखेचे रत्नागिरी तालुक्याचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी खास कौतुक केले.यावेळी प्रकाश पवार यांनी उपस्थितांना तालुका शाखेच्या कामकाजाची प्रभावी माहिती देऊन तालुका शाखेच्या प्रत्येक उपक्रमांत मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या समवेत समितीचे उपाध्यक्ष विजय आयरे , चिटणीस सुहास कांबळे कोषाध्यक्ष मंगेश सावंत, समितीचे माजी अध्यक्ष तु.गो. सावंत ,संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार ,विलास कांबळे आर.डी. सावंत, शिक्षण समितीचे सदस्य सभापती जयवंत कदम ,आरोग्य समितीचे सभापती दिनकर कांबळे आदींसह तालुक्यातील धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी गडनरळ गाव शाखेचे सर्व पदाधिकारी,महिला मंडळ व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.