(मुंबई)
विरारमधील एका रुग्णालयात दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरच्या निष्काजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अंगात ताप आल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या औषधोपचारामुळे बाळ दगावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
श्रीवेद विजय रिंगे (२ वर्षे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील यशोदा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. श्रीवेदला ताप आल्याने यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार करताना चिमुकला सतत हात हलवत असल्याने, नर्सने बाळाला झोपेचे औषध दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या औषधानंतर बाळाची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित मॅनेजमेंट आणि डॉक्टरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलीस आणि पालिका प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वडिलांनी केली आहे.