(मुंबई)
डाव्होसमधून महाराष्ट्रासाठी भरीव गुंतवणूक आली तर आनंदच आहे, पण महाराष्ट्रातील प्रकल्प परराज्यात जात असतील तर शिंदे-फडणवीस सरकारने आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल. येथील तरुणांना रोजगार मिळत असेल तर आनंदच आहे, मात्र महाराष्ट्रातून मोठी गुंतवणूक राज्याबाहेर गेली. त्यामुळे लाखो तरुणांचा रोजगार गेला. त्याबाबतही शिंदे सरकारने आत्मचिंतन करायला हवे.
काही हजार कोटींचा एमओयू झाला आहे, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात किती प्रकल्प येतात हे कळेलच. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे डाव्होसला गेले होते. तेथे कोणाला पाठवावे हा शिंदे-फडणवीस सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र महाराष्ट्रासाठी गुंतवणूक यायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले.
मविआत समन्वयाचा अभाव, हे अमान्य
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीबाबत त्यांनी सांगितले की, या निवडणुकीतील अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, निवडणूक घोषित झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते, मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण आम्हाला लागली होती आणि त्याची कल्पना मी काँग्रेसच्या वरिष्ठांना दिली होती. नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसणे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही, असेही पवार म्हणाले.