(देवरुख)
ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल.ठेकेदार प्रवृत्तीचे लोकं ग्रामीण राजकारणात आहेत यामुळे विकासात अडथळे येत आहेत. परिणामी कोणीतरी पैसेवाला शेठ येईल आणि आपल्या गावांचा विकास करेल या मानसिकतेतून लोकांनी बाहेर पडावे, असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी गोताडवाडी येथे आयोजित सभेत बोलताना केले.
धनिन देवी सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी शिमगोत्सव निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुहास खंडागळे यांनी ग्रामीण विकासाबाबत भाष्य केले. ठेकेदार प्रवृत्तीचे लोक राजकारण असल्याने गावांचा सर्वांगीण विकास होण्यात अडथळे येत असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले. ग्रामपंचायत कारभारात तरुणांनी लक्ष घातले पाहिजे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांचे सदस्य दुर्दैवाने अनेक लोकांना माहीत नसतात, अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे याकडेही खंडागळे यांनी लक्ष वेधले.
कोणीतरी पैसेवाला येईल आणि आपल्या ग्रामीण भागात एखादा रस्ता पाखाडी करून देईल, अशा पद्धतीची मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावांच्या विकासाला चालना दिली पाहिजे असे मत खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले. गावागावात असणारी गटबाजी ज्या दिवशी मोडीत निघेल त्या दिवशी गावांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला असेल, ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे खंडागळे म्हणाले.
एका गावात तीन, चार राजकीय गट असल्यानेच गावाचा विकास होत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले. मोर्डे करंबेळे ग्रामपंचायत चे सदस्य असणारे नितीन गोताड यांनी मागील दोन वर्षात नळपाणी योजना, रस्ते विकासातील अडचणी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत खंडागळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर गावचे गावकर राजेश तुकाराम गोताड, अध्यक्ष उदय गोताड, गावीसचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, डॉ. मंगेश कांगणे तसेच गोताडवतील सांगली व मुंबई मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.