(ठाणे)
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावर आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्याने त्यांना 45 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
कळवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या आतापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांबाबत सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तर त्यांचा प्रभारी कार्यभार कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकच दिवशी झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. तर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.