(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, अशी साद राज ठाकरेंना घेतली. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले.
उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का, असा प्रश्न माध्यमांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मी लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे, त्यात सर्व काही स्पष्ट करेन. पुढील काही दिवसांत राज्यभर मनसे पक्षाचा मेळावा होणार आहे. यात मी राज्यात चालू असलेल्या राजकारणावर सविस्तर बोलणार आहे. तेव्हाच मी यावर सविस्तर भूमिका मांडेन’, असेही राज ठाकरे म्हणाले. तर मनसेचे अध्यक्ष बाळा नांदगावकर म्हणाले की, ‘ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन मी आधीही भूमिका मांडली होती. हे सर्वांना माहीत आहे. हा विषय राज ठाकरेंचा आहे. तो दोन भावंडांचा विषय आहे. त्यात मी बोलणे उचित नाही असे मी समजतो.
बॅनरमुळे चर्चा
मुंबईतील दादर येथे शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे,’ असे आवाहन या बॅनरवर करण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. शिवसेना भवन दादर येथील शिवसेना भवनासमोर लक्ष्मण पाटील या महाराष्ट्र सैनिकाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील राजकीय बंडामुळे वातावरण तापले असताना दुसरीकडे या बॅनरची चर्चा सुरु झाली आहे.