पालघर जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या धडकेने पश्चिम रेल्वेच्या (WR) तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचारी सिग्नलची समस्या दूर करत होते. ही घटना सोमवारी रात्री 8.55 वाजता वसई रोड आणि नायगाव स्थानकांदरम्यान घडली, असे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्याने सांगितले. लोकल ट्रेन चर्चगेटच्या दिशेने जात होती.
मुख्य सिग्नलिंग निरीक्षक (भाईंदर) वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नलिंग मेंटेनर (वसई रोड) सोमनाथ उत्तम लांबुत्रे आणि मदतनीस सचिन वानखेडे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील सिग्नलिंग विभागातील असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. सोमवारी संध्याकाळी तुटलेले काही सिग्नलिंग पॉईंट दुरुस्त करण्यासाठी ते गेले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. पश्चिम रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत म्हणून 55,000 रुपये दिले आहेत.