(मुंबई)
टोलनाक्यांवर चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकीचा टोल घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारला दिला आणि तासाभरातच मनसैनिक पनवेल, मुलुंड आणि वाशी टोलनाक्यांवर धडकले. राज्यातील टोलनाक्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर आज राज ठाकरेंनी आपल्या शैलीत 7 व्हिडिओ दाखवून नेत्यांची पोलखोल केली आणि टोलमध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रातील टोल प्रश्न हाती घेतला असून त्याविरोधात मोहिम हाती घेतली आहे. पंरतू आता त्यांच्या या आक्रमकपणामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली आहे. ‘टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा’ अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे. तसंच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
टोलनाक्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेचे अविनाश जाधव यांना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यासाठी खुद्द अॅड. गुणरत्त्न सदावर्ते शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे हा वाद चिघळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत टोलनाक्याच्या आंदोलनाला धार दिली जात आहे. यावरून फडणवीसांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच टोलनाका पेटविल्याने आता मनसे आणि भाजप नेत्यांत वाद चिघळण्याची शक्यता आहे.
टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्यामुळे मला असे वाटते की, याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येते ते पाहू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल म्हटल्याप्रमाणे चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकीला टोल नाही, तर आमची माणसे रस्त्यावर उतरतील आणि जिथे टोल घेतला जाईल तिथे त्यांना थांबवले जाईल. आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर असे टोलनाके आम्ही जाळून टाकू. पुढे सरकारला जे करायचे ते त्यांनी करावे, असे ठाकरेंनी म्हटले.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘टोलनाके बंद करू’ या वक्तव्यांच्या व्हिडिओ क्लिप सादर केल्या. यातील एक व्हिडिओ क्लिप फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याची होती. ‘टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर चारचाकी, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवर आपण टोल घेतो. त्यासाठी सरकार पैसे भरते, असे फडणवीसांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे. यावरून ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘हे खरे आहे का? हे तर धादांत खोटं बोलत आहेत. यांनी जर सूट दिली होती तर हे पैसे नेमके कुठे जात आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.
राज ठाकरेंच्या इशार्यानंतर मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी टोलनाक्यावरून जाणार्या गाड्यांना टोल न भरताच पुढे सोडण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील होते. पोलिसांनी जाधव यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल येथील शेडुंग टोलनाक्यावरही मनसैनिक आक्रमक झाले. त्यांनीही वाहनांना विनाटोल सोडले. वाशी टोलनाक्यावरही मनसे आक्रमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला.