(गुहागर)
सोमवारी (ता. 9 मे) दुपारी पाटपन्हाळे येथील एकमुखी दत्तमंदिराच्या मागे काजुच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह ग्रामस्थांना दिसला. तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी गुहागर पोलीसांना कळविले. या घटनेची माहिती श्रृंगारतळी वेळंब रोड येथे रहाणाऱ्या आरेकर कुटुंबाच्या हितचिंतकांपर्यंत पोचली. सिद्धेश 7 मे रोजी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला होता. तो दोन दिवसात घरी आला नव्हता. शंकेची पाल चुकचुकली. तातडीने आरेकर कुटुंबियांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सदर आत्महत्या करणारा युवक म्हणजे 25 वर्षीय सिध्देश बळीराम आरेकर असल्याचे लक्षात आले. कुटुंबियांनी मृतदेहाची खात्री केल्यानंतर पोलीसांनी पंचनामा करण्यास सुरवात केली. त्यावेळी सिध्देशच्या हातात एक कागद असल्याचे लक्षात आले. हा कागद पोलीसांनी तपासला. सिध्देशने आपण निराश झाल्याने आत्महत्या करत आहोत असे लिहिल्याचे समोर आले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी वेळंब रोड येथील 25 वर्षीय युवकाने पाटपन्हाळे येथे एका मंदिराच्या मागील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या नैराश्यातून केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
खरतरं सिध्देशचं कुटुंब मुळ गुहागरचे. सिध्देशचे आई वडिल, बहिणी हे सर्वजण गुहागरमध्ये रहात होते. सिध्देशचे वडिल बळीराम आरेकर गुहागर ग्रामपंचायतीमध्ये नोकरीला होते. त्यांचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी हे कुटुंब शृंगारतळीला रहायला गेले. सणासुदीला हे कुटुंब गुहागरला येत असे. त्यामुळे सिध्देशच्या आत्महत्येनंतर गुहागरमधील अनेकांना धक्का बसला आहे.
गुहागर पोलिसांनी पंचनामा करून सिद्धेशचा मृतदेह चिखली येथील प्राथमिक रुग्णालयांमध्ये अधिक तपासणीसाठी नेला. सायंकाळी 6 च्या दरम्यान शवविच्छेदनाची प्रक्रिया झाल्यावर पोलीसांनी सिध्देशचा मृतदेह आरेकर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात शृंगारतळी येथील स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. सिद्धेशच्या पश्चात तीन बहिणी, आई असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील शिवलकर करत आहेत.