(रत्नागिरी / प्रतिनिधी)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यालयाची भौतिक गरज ओळखून रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक सुनिलशेठ भोंगले यांनी दिलेल्या देणगीतून प्रवेशद्वार कमानीचे भव्य उदघाटन, जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज यांच्यामार्फत मिळालेल्या 2 संगणक व संगणक लॅब चे उदघाटन तसेच शासनामार्फत मिळालेल्या अनुदानाचे विद्यालयाच्या क्रीडांगणाचे भूमिपूजन अशा संयुक्तिक विविध कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभागाचे विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, रत्नागिरी जिल्हा ऍडिशनल एस. पी. जयश्री गायकवाड, नाणीज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, आजीवसेवक तथा संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, संस्थेचे आजीवसेवक तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत काटे, टी. डब्ल्यू. जे. रत्नागिरी च्या मॅनेजर मनीषा पाटणे, रोटरी क्लबच्या ऍड. शाल्मली आंबूलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम पिलणकर, स्कूल कमिटी अध्यक्ष अशोक पवार, शिक्षक तानाजी गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साही वातावरण संपन्न झाला.
ढोल ताशांच्या व लेझिमच्या गजरात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे आजीवसेवक तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत काटे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यालयाच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा मान्यवरांसमोर मांडला. यानंतर पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून विद्यालयाच्या उज्वल प्रगतीबद्दल, क्रीडा क्षेत्रातील जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय यशाबद्दल समाधान व्यक्त करीत सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात जर टिकायचे असेल तर अभ्यासाबरोबर संगणकाचे ही ज्ञान तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानाचा उपयोग नाही तर त्या बरोबरीने आधुनिक अध्ययनाची ही जोड हवी. संगणकाचे ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला असणे अत्यावश्यक आहे. आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी बरोबरीने संगणकीय क्षेत्रात निपुण असणारा विद्यार्थी बनणे ही काळाची गरज बनली आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथे संगणक लॅब चे उद्घाटन जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी संगणकीय ज्ञानातून वाटचाल करावी
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून विद्यालयाच्या उज्वल प्रगतीबद्दल आणि संगणक लॅब सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी संगणकीय क्षेत्रात उत्तम ज्ञान घेऊन आधुनिकतिकडे वाटचाल करावी अशा शुभेच्छा पुढील वाटचालीकरिता सर्वांनाच दिल्या.
विद्यालयाच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सांस्कृतिक, कला बरोबरीने क्रीडा क्षेत्राचे योगदान ही महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता यावी म्हणून शासनामार्फत मंजूर झालेल्या क्रीडा अनुदानाच्या माध्यमातून मैदानाचे भूमिपूजन विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर व विद्यार्थी या सर्वच घटकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिपक पाटील यांनी केले तर आभार शिक्षक सैफुद्दीन पठाण यांनी मानले.