(मुंबई)
तरुणाई “रंगीली” दुनियाची शिकार होत असतानाच आता जेष्ठ नागरीकही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात फसत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईमधील सेक्सटॉर्शन रॅकेटच्या एका प्रकाराने खळबळ उडाली आहे. सीबीडी बेलापूरमधील ७२ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला आहे. आठवडाभरापूर्वी या व्यक्तीला एका अज्ञात महिलेचा व्हीडिओ कॉल आला. या व्हीडिओ कॉलवरील महिलेकडून ज्येष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अगोदरच केलेल्या नियोजनानुसार सायबर चोरट्यांंनी हा व्हीडिओ कॉल रेकॉर्ड केला आणि नंतर ज्येष्ठ नागरिकाला हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. प्रकरण मिटवण्यासाठी घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने १ लाख २७ हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही या ज्येष्ठ नागरिकाकडे सायबर चोरट्यांनी वारंवार अधिकच्या पैशांची मागणी केली गेली. त्यामुळे या नागरिकाने सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याआधीही अनेक वेळा राज्यात सेक्सटॉर्शनचे प्रकार समोर आले आहेत. अशाच ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने नकळत घेतलेला तरुणाचा नग्नावस्थेतील व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती. दरम्यान ती तरुणी सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. आत्महत्या केलेला २५ वर्षीय तरुण हा पुण्यात रहायला होता. त्याने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
अशा कोणत्याही प्रकारे अमिषाला, ब्लॅकमेलिंग बळी पडू नये, जर असा कोणताही प्रकार घडत असेल तर नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.