(नवी दिल्ली)
जून महिन्यात १.४५ लाख कोटी जीएसटी संकलन झाले आहे. अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा टप्पा असून मार्च महिन्यापासूनच करसंकलन १.४० लाखांच्या पुढे कायम आहे. ग्राहकांच्या मागणीत वाढ आणि अर्थचक्र गतिमान झाल्याचे हे लक्षण आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या वर्षातल्या जून महिन्याच्या तुलनेत कर संकलन या वर्षी ५६ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९२,८०० कोटींचे संकलन झाले होते. अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२२ मधला एकत्रित महसूल १,४४,६१६ कोटींवर पोहोचला आहे. ज्यात केंद्रीय जीएसटी २५,३०६ कोटी, राज्य जीएसटी ३२, ४०६ कोटी इतकी होती. एकात्मिक जीएसटी ७५, ८८७ कोटी, उपकर संकलन 9909 कोटी इतकी आहे.
जीएसटीला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मत व्यक्त केले आहे. जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे कायम राहिलेले आहे. त्यामुळे आता तोच तळ निश्चित झाला आहे. यापुढे ते कायम वाढतच राहील, असेही सीतारामन यांनी सांगितले.