(मानसिक संतुलन भाग – ५)
मनुष्य जन्माचे अंतिम लक्ष ज्ञान मिळवणे हे आहे. परंतु ते न कळल्याने मनुष्य भरकटतो. मुख्य उद्दिष्ट लक्षात न आल्याने आयुष्यभर मृगजळासमान असलेल्या सुख दुःखात लडबडत राहतो. अज्ञानी पालक आणि सदोष शिक्षण पद्धत ही दोन प्रमुख कारणे त्यामागे आहेत. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत मुलांना खूप काही शिकवले जाते. परंतु मनाला कसे बघायचे व त्यास कसे प्रशिक्षित करायचे, याचे शिक्षण मात्र दिले जात नाही. खरे तर ते द्यायला हवे. आपल्या डोळ्यासमोर नष्ट होणाऱ्या सजीव आणि निर्जीव वस्तू, आपली माणसे अशी अचानक नाहीशी होताना पाहून मनाची अवस्था संभ्रमित होते. आपण घाबरून जातो. ‘आता माझे कसे होणार’ अशी भावना आपल्याला नकळतपणे चिंतेत लोटते. म्हणूनच हे जे चालले आहे ते नेमके आहे तरी काय? याचा शोध घेणे हेच खरे आपले जीवन उद्दिष्ट असायला हवे. आपल्या बाबतीत काही सुखकारक गोष्टी घडत असतांना याचे भान रहात नाही. परंतू नश्वर घटकांवर अवलंबून असलेले आपली ही सुखे काही काळाने नाहीशी होतात. आणि दुःख निर्माण होते.
लहानपणी एखादी गोष्ट आपल्याला प्रथमच समजे किंवा येऊ लागे तेव्हा केवढा आनंद होई! माहित नसलेले माहीत होणे ही मोठी आनंददायी गोष्ट आहे. मंडणगड तालुक्यात तळेघर नावाच्या एका लहानशा खेड्यात वानप्रस्थाश्रम हा वृद्धांचा योग प्रकल्प चालतो. पन्नाशी उलटलल्या वृद्धांसाठी हा प्रकल्प आहे. आपल्या जीवनाच्या चार अवस्था आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ,आणि सन्यास. यातील तिसरी अवस्था म्हणजे वानप्रस्थाश्रम! याचा एक प्रयोग आनंद विहार आश्रमाच्या माध्यमातून तिथे चालतो. ह्या वर्गात वृद्धांना वैराग्याचे शिक्षण दिले जाते. सर्व वृद्ध खेड्यात राहणारे असल्याने त्यांचे जीवनाबद्दल चे ज्ञान खूपच सीमित असते. अगदी सहज आणि सोप्या भाषेत प्रॅक्टिकलसह हे ज्ञान दिले जाते. जीवनाबद्दलचे एखादे नवीनच तत्व समजले की समोर बसलेल्या आजीचे डोळे विस्फारतात एखादे काहीतरी नवीनच गवसल्याचा तिला भास होतो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. ज्ञानाचे वेगळे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकते! हा प्रकल्प लोकप्रिय होऊ लागला आहे. भविष्यात हा प्रकल्प ‘वृद्धाश्रमास’ पर्याय ठरू शकेल. ज्ञानाची गरज सर्वानाच आहे. ‘सर्व दुःखाचे मूळ अज्ञान आहे’; असे गौतम बुद्ध म्हणतात ते उगीच नाही.
एखादा कठीण प्रश्न जेव्हा उलगडतो तेव्हा किती आनंद होतो हे अनुभवल्याशीवाय समजणे कठीण आहे. अर्धनग्न अवस्थेत आर्किमिडीज उगीच नाही “युरेका युरेका” म्हणत भर रस्त्यातून धावत सुटला होता! त्याने तेव्हा भौतिक जगातून एका दिव्य जगात प्रवेश केला होता. त्या जगात भौतिक जगातील मानवनिर्मित कोणतेही नियम लागू होत नाहीत. त्यात असतो केवळ ज्ञानाचा दिव्य आनंद आणि कधीही न संपणारी तृप्ती! कधीतरी प्रत्येकाने असा दिव्यानंद घेऊन पहावा. कित्येकांच्या जीवनात हा आनंद येतच नाही. आपली दैनंदिन सुखदुःखे विसरण्यासाठी कधीतरी एकांतात जावे. डोक्यावर पसरलेल्या त्या विस्तीर्ण आकाशाकडे पाहावे. समुद्रकिनारी जाऊन त्या अथांग समुद्राकडे एकटक बघावे, हिरव्या गर्द झाडीत थोडावेळ हरवावे. जीवनाची सारी तत्वे तिथे गवसतील. ज्यांना आपण मोठी दू:खे समजतो ती अगदी लहान दिसतील. कारण त्यावेळी तुमच्यातील दिव्य स्वरूप जागे झालेले असते. ज्ञान सूर्याचा उदय होत असतो. मात्र यात सातत्य हवे. रोज नित्य नेमाने काही काळ स्वतःचा शोध घेण्यात घालवायला हवा. म्हणजे निराशा जीवनात डोकावणार नाही.
अलीकडील अनेक शाळांना “ज्ञानमंदिर ” असे नाव दिलेले आढळते. खरेच का ती ज्ञानाची मंदिरे असतात? की महितीमंदिरे असतात? खरे तर शाळेला भिंती नसाव्यात. असे रवींद्रनाथ टागोर म्हणत. खरी शाळा मोकळ्या निसर्गात असते. तिथे गुरुजी माहिती देतात तर निसर्गाच्या प्रयोग शाळेत मुळे त्याची पडताळणी घेतात. आधुनिक शाळेतील प्रत्येक इयत्तेत काही विषय अभ्यासाला असतात. त्या त्या विषयाची माहिती शिक्षक त्या वर्गातील मुलांना देत असतात. मुले ते ऐकतात. लक्षात ठेवतात. परीक्षेत त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देतात. व पास होतात. पुढच्या इयत्तेत गेल्यावर मागच्या इयत्तेतील ७५ % भाग ती विसरतात. आता फक्त पुढच्या इयत्तेतील अभ्यास! तीच पद्धत, तीच परीक्षा! असे पदवीधर होईपर्यंत चालते. तोपर्यंत मुलास स्वतःबद्दल किती समजलेले असते बरे? इतकी वर्षे त्याने स्वतःची तुलना बाह्य जगताशी करीत वाया घालवलेली असतात. एवढ्या वर्षात त्याने काय केले?…दिलेल्या विषयात फारसी गती नसतांनाही अभ्यास केला. रात्री जागरणे केली. स्पर्धा परीक्षेत भाग घेतला. प्रतिस्पर्धकाला हरवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. टॉपला येण्यासाठी जीवाचे रान केले. आणि शेवटी अहंकाराचा परिपूर्ण असा पुतळा बनला. किंवा निराशेच्या गर्तेत लोटला गेला. अंगभूत आवड नसतांनाही, भौतिक सुखसुविधांना व तथाकथित प्रतिष्ठेला डोळ्यासमोर ठेऊन प्रचंड डोनेशन देवून एखाद्या उच्चभ्रू कॉलेजला ऍडमिशन घेतले गेले. मनमोकळा स्वभाव असलेल्या किंवा भावनाशील स्वभाव असलेल्या, स्वत:चा शोध घेऊ पाहणाऱ्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला ते ओढून ताणून निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण पचनी पडत नाही. त्याची परिणीती निराशेत होते. आवड नसतांनाही केवळ वरील कारणांमुळे डॉक्टर, इंजिनियर यासारख्या साईडला जाऊन आत्महत्या केलेली उदाहरणे अधून मधून कानावर येतात. यास ज्ञान म्हणावे की अज्ञान?
आज शिक्षण घेत असलेली फार कमी मुले किंवा मुली अशा असतात की त्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबाबत संवेदनशील झालेल्या असतात. मनात करुणा असते, कठीण समयी ताठ उभे राहण्याची हिम्मत त्यांनी मिळवलेली असते. योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ येथे संधिवात झालेली अगदी तरुण मुलगी योग शिकायला आली. तिच्या हातापायाची बोटे वाकडी झाली होती. कंबरेला पोक होते. तीला रुमेटाईड अर्थराईटीज नावाचा संधिवात झाला होता. सांधे दुखीचा हा सर्वात घातक प्रकार! ऐन तारुण्यात तिच्यावर ही आपत्ती ओढवली होती. तिला धड चालताही येत नव्हते. जीवनाबद्दल ती अत्यंत निराश झाली होती. जगण्यासाठी काहीच शिल्लक उरले नव्हते. तिचे बाबा तिला योग इन्स्टिट्युट मध्ये घेऊन आले. तिथे तिला प्रथमच जीवन म्हणजे काय हे समजले. आसन प्रॅक्टिस करून तिने स्वतःच्या आजारावर नियंत्रण मिळवलेच, परंतु तिच्या स्वतःमधील असलेल्या गुणांचाही तिला शोध लागला. तिचा गळा गोड होता. ती संगीत शिकली. गोड गळ्यातून मनाला उभारी देणारी गीते ती गाऊ लागली. पुढे ती योग टीचर बनली. योग इन्स्टिट्युट मध्ये भरणाऱ्या “Stress Management Camp” मध्ये आपल्या गोड गळ्याने भक्ती गीते व स्फूर्ती गीते गाऊन निराश झालेल्यांना नवीन जीवनाची दिशा देऊ लागली. आज ती स्वतःला झालेल्या आजाराला, ईश्वरी देणगी मानते. जर तो आजार झाला नसता तर जीवनाचे इतके सुंदर रूप ती कधीच अनुभऊ शकली नसती. अशाप्रकारे जीवनाचे खरे उद्दिष्ट ज्यांना गवसते ते खरेच भाग्यवान. मात्र अशी माणसे हातावर मोजण्याइतकी असतात. ९०% माणसांची फरफटच होत राहते. ती नशिबालाच दोष देत रहातात.
वास्तविक स्वतःस जाणणे म्हणजे शिक्षण! बाह्य जगतातील भारंभार माहिती डोक्यात कोंबणे हाच जर शिक्षणाचा हेतू असेल तर मनुष्य जन्माचे आपण फार मोठे नुकसान करीत आहोत. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. अति उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्येही आत्महत्येचे प्रमाण काही कमी नाही. उलट आधुनिकतेच्या नावाखाली वावरणारा माणूस आतून पार कोलमडून गेलेला दिसतो. काही ह्या यंत्रणेचे शिकार झाले आहेत. काही त्या मार्गावर आहेत. काहींची सूरवात आहे.
साधा शेतकरी त्यामानाने खूप सुखी असतो. कष्ट करावे, घाम गाळावा, असेल ते खावे, ईश्वराचे चिंतन करावे आणि गाढ झोपावे. सुख आणि समाधानाच्या शोधात असलेल्यांनी एकदातरी अशा शेतकऱ्याच्या घरी वास्तव्याला जावे. व त्याची दिनचर्या बघावी. हेवा वाटेल अशी मनाची शांती त्याच्याजवळ असते. शहरातील लोकांना अशा (भ्रामक) शांती व समाधानाचा अनुभव मिळावा म्हणून काही चलाख व्यावसायिकांनी गावाकडे साध्या झोपड्यांचा देखावा करून त्यात Five Star सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातून रग्गड पैसा कमावण्याची नवीन कल्पना सध्या कोकणात टुरिझमच्या नावाखाली जोरात सुरू आहे. अशाने शांती मिळत नसते. ह्या सर्वांतून आपण निसर्गापासून खूप दूर जात आहोत. स्वतःला फसवत आहोत.
नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की जे निसर्गाच्या सानिध्यात वाढले, ते संत, विचारवंत, आधुनिक शाळेपेक्षा निसर्गाच्या शाळेत अधिक शिकले. काही तर आधुनिक शाळांतून चक्क नापास झालेले होते. तर काहींना शाळेतून चक्क काढून टाकले होते.
तथाकथित जीवनाची जी आपण चौकट धारण केलेली असते ती फोडल्याशिवाय, त्यातून मोकळे झाल्याशिवाय आत्मविकास होणे कठीण आहे. स्वतःचा आत्मविकास करायचा असेल तर स्वतःला समजून घ्यावे लागेल. त्यासाठी अंतरंगातील संवेदना जाणवायला हव्यात. त्या जाणीवांना योग्य वळण द्यायला आपल्याला शिकावे लागेल.
शिकणे ही सहज प्रक्रिया आहे. ती आपोआपच होत असते. बीजाला एकदा का पोषक वातावरण मिळाले की त्याची वाढ होण्यासाठी निसर्ग त्यास मदत करतो. त्याने फक्त हलावे डुलावे. मस्त मजेने आनंद घ्यावा. आपले ही तसेच आहे. शरीर आणि मन योग्य दिशेने विकसित होण्यासाठी त्यास आवश्यक ते वातावरण तयार करणे हे पालकांचे व शिक्षकांचे काम, आणि त्यात अगदी नम्रतेने स्वतःस झोकून देणे हे शिष्याचे काम. निसर्गाचे नियम यथायोग्यपणे पाळल्यास आपला विकास योग्य दिशेने नक्कीच होतो. मात्र अशावेळी शिष्य स्वतःच्या अवगुणांचा किती वेगाने होम करतो आहे, त्यावर त्याच्या आत्मोंनतीचा वेग ठरतो.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक, मंडणगड
मोबाईल 9420167413