(रत्नागिरी)
कोरोनामुळे मागील दोन वर्षात यांत्रिकीकरणाचे प्रस्ताव मंजूर झाले नव्हते; मात्र सहा महिन्यांपुर्वी या योजनेसाठी ६ कोटी १४ लाखाचे उद्दीष्ट रत्नागिरी जिल्हा कृषी विभागाला निश्चित करुन दिले होते. त्यामधून मार्च अखेरपर्यंत ३ कोटी ८९ लाख रुपये अनुदान रुपाने शेतकर्यांना वितरीत करण्यात आले. याचा लाभ २ हजार १२ लाभार्थ्यांना मिळाला.
गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात शेती, बागायतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व वाढले असून शेतकरी, बागायतदार यंत्राचा वापर सर्वाधिक करत आहे. दरवर्षी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांसाठी दोन ते तीन कोटी रुपये जिल्ह्याला मिळतात. त्यातील नव्वद टक्केहून अधिक निधी खर्ची टाकला जातो. सध्या शेती साहित्य खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारले जातात. पुर्वी ऑफलाईन अर्ज घेण्यात येत होते. २०२० मध्ये कोरोनाची लाट आली आणि अनेक योजनांना निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. एक वर्ष फक्त शेतकर्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. निधीअभावी शेतकर्यांना यंत्रे खरेदी करता आलेली नाहीत.
रत्नागिरी जिल्ह्यात भातशेती आणि आंबा, काजू बागायतीमध्ये यंत्रांचा वापर केला जातो. नांगरणीसाठी पुर्वी बैलांचा वापर केला जात होता; मात्र बैलांची जोपासना करणे खर्चिक होते आणि मंजूरीचा खर्चही अव्वाच्या सव्वा आहे. शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने भातशेतीकडील कल कमी झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त यंत्रांच्या वापरावर भर दिला आहे. जिल्ह्यातून यंत्रे खरेदीसाठी दोन वर्षात ८ हजार प्रस्ताव आले होते. त्यातील बहूसंख्य शेतकरी पॉवर विडर, बुश कटर, पॉवर टिलर या साहित्यांची खरेदी करत आहेत. यंदा लॉटरी पध्दतीने शेतकर्यांना अनुदान वितरीत करण्यात आले.
ऑनलाईनचा फटका
यंत्रे खरेदीवर शेतकर्यांकडून अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागत आहेत; मात्र अनेकवेळा चुकीचा अर्ज भरल्यामुळे ते रद्द केले जात आहेत. प्राप्त प्रस्तावांपैकी पन्नास टक्के रद्द करण्यात आले आहेत. त्यात एकच लाभार्थी अनेक अर्ज भरत असल्याचे लक्षात आले आहे. तर अवजारांची नावे माहिती नसल्यामुळेही काही शेतकर्यांचे अर्ज बाद झाले आहेत.