( रत्नागिरी )
ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ४१ कोटी ६९ लाख ८४ हजार २२६ रुपये घरपट्टी वसुल केली आहे. जिल्ह्याची घरपट्टीची एकूण वसूली ८३.४३ टक्के झाली आहे. मात्र, अजूनही ८ कोटी २८ लाख ३९ हजार ५० रुपये घरपट्टी थकीत आहे.
जिल्हा परिषदेला घरपट्टी, पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत.
रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे. डोंगरदऱ्यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.
जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ४३ कोटी ७८ लाख ६ हजार ६४१ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४१ कोटी ६९ लाख ८४ हजार २२६ रुपये वसुली करण्यात आली. सन २०२१-२२ या वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकीत रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ६ कोटी २० लाख १६ हजार ६३५ रुपये एवढी थकबाकी वसूल करणे बाकी आहे.
तालुका – थकीत घरपट्टी
मंडणगड – ७२३१३८
दापोली – १३२८५२०५
खेड – १५५३१८५३
चिपळूण – १२९७२६४६
गुहागर – २५२४६७६८
संगमेश्वर – ८५४५९८३
रत्नागिरी – २५४०८९०
लांजा – १३३९६६६
राजापूर – २६५२९०१