(खेड / भरत निकम)
कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी खळा बैठकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणातील ‘जॉईन्ट किलर’ असणाऱ्या संजय कदमांना आगामी निवडणुकीची तिकीट जाहीर करुन थेट भावी आमदार म्हणून उपमा दिली आहे. यामुळे रामदास कदमांची धाकधूक वाढली असून २०२४ चा निकाल काय लागतोय, हे पहाणे औत्सुक्याचे ठरत आहे. संजय कदम योगेश कदमांना भारी पडतील का? आदित्य ठाकरेंना इतका आत्मविश्वास का आहे? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.
कोकणातील ठाकरे गट मजबूत करण्यासाठी बाप लेकाना संजय कदमांनी अंगावर घेतलंय. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आदित्य ठाकरेंनी संजय कदमांना भावी आमदार म्हटलंय. संजय कदमांचा इतिहास हा डेंजर असून सरपंच पदापासून जि.प उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारत गेले आहेत. २०११ सालात शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. २०१४ ला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवून शिवसेनेच्या सूर्यकांत दळवींचा पराभव करुन ते आमदार बनले. २०१९ च्या निवडणुकीत ते योगेश कदमाविरोधात मैदानात उतरले, तेव्हा निसटता पराभव झाला.
शिवसेनेच्या फुटीनंतर रामदास कदम शिंदे गटात गेले, म्हणून संजय कदमांनी ठाकरे गटाला साथ दिली. आता योगेश कदमांविरोधात त्यांनी दंड थोपटलेत. पूर्वी संजय कदम रामदास कदमांचे समर्थन म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रामदास कदमांशी वैर घेतले. २५ वर्षे आमदार सूर्यकांत दळवींना पराभवाची धूळ चारली. निवडणुकीपूर्वीच विजयी मिरवणूक काढणारे ते राज्यातील एकमेव उमेदवार म्हणून प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील राजकारणातील ‘जॉईन्ट किलर’ म्हणून ओळखले जातात.
ठाकरे गटाने योगेश कदमांना पडण्याची जबाबदारी संजय कदमांवर टाकलेली आहे. दांडगा जनसंपर्क हीच संजय कदमांची ताकद आहे. गावाच्या सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात केल्यामुळे स्थानिक पातळीवर मजबूत ताकद आहे. सध्या सूर्यकांत दळवी साथीला असल्याने बळ वाढलंय. ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढल्याने सहानुभूतीचा फायदा होवू शकतो. तसेच रामदास कदमांच्या घरणेशाहीच्या राजकारणाला पर्याय म्हणून संजय कदमांना पाठिंबा वाढू शकतो. संजय कदमांच्या सारखा लढावू नेतृत्व सोबत असल्याने आदित्य ठाकरेंना विजयाची खात्री आहे. निवडणुकी आधीच आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनी गुलालाची हमी दिलेय. पण, २०१४ प्रमाणेच संजय कदम ताकद दाखवतील का? दापोली मतदार संघातील पुढील आमदार कोण होणार? हा प्रश्न औत्सुक्याचाच ठरत आहे.