(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या तीन रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर नर्स पोलीस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे आपली सेवा बजावत असतात. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका अर्थात रुग्णवाहिकेचे चालक. गेल्या अनेक वर्षभरापासून जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका चालक आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कोणत्याही ठिकाणी अपघात झाल्यावर संस्थान रुग्णवाहिका चालकांना फोन केल्यावर काही सेकंदात नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका दाखल होते. जखमी रूग्णांना अगदी व्यवस्थितरित्या हाताळून जखमींना रुग्णालयापर्यंत आणणे हे महत्त्वाचं काम रुग्णवाहिकेचे चालक करत असतात.
हातखंबा भागात अनेक अपघात होत असतात. याठिकाणी शासनाची १०८ रुग्णवाहिका पोचण्यास कायम विलंब होत असतो. मात्र संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक धनेश(बाळू) केतकर यांना कॉल केल्यावर काही सेकंदात रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी दाखल होतात. आज पर्यंत या रुग्णवाहिका देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आलेल्या आहेत. तसेच अनेक रुग्णांचे प्राण देखील चालकांनी वाचवले आहेत. या चालकांची कार्यतत्परता कायम वाखाणण्यासारखीच आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव ३४ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत रत्नागिरी पोलीस प्रशासनाने केला आहे. नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर (हातखंबा ), गुरुनाथ नागवेकर (संगमेश्वर), मुकूंद मोरे (कशेडी) यांना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.